वाढदिवसाच्या दिवशी गरजु रुग्णाला केलं रक्तदान

चंद्रपुर/खबरबात:
  अमोलचा फोन नेहमी प्रमाणे खणखणला समोरुन मदन चिवंडे (रक्तदान महादानचे सदयस) बोलत होते आपल्याला CHL हॉस्पिटलमध्ये भर्ती असलेले विनोद वंजारी गडचिरोली ह्यांना AB+ रक्त गटाची तात्काळ गरज आहे असं बोलले लगेच अमोलनि संजीवनी रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान केलं.

अनेक जण आपल्या जन्मदिन किंवा वाढदिवस केक कापून, पार्टी करुन साजरा करतात. परंतू याला अपवाद ठरले ते चंद्रपूर तालुक्यातील जुनोनाचे दै.खबरबातचे प्रतिनिधी अमोल जगताप. त्यांनी आपल्या जन्मदिनी रक्तदान केले आणि प्रत्येक वाढदिवशी रक्तदान करण्याचा संकल्प केला. अलीकडे जिल्ह्यात अनेक ठिकाणी रक्ताचा वारंवार तुटवडा जाणवतो. अनेकदा सोशल मीडियावरून आवाहन करूनही रक्तदाते मिळत नाहीत. यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येतो. अशा स्थितीत त्या रुग्णाचे होणारे हाल आणि नातेवाईकांची होणारी धावपळ पाहून चुकचुकणारे अनेक जण असतात; मात्र त्यावर ठोस उपाय करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. यावर उपाय म्हणून निदान चंद्रपूर तालुक्यातील विविध गटांचे रक्तदाते एकत्र यावेत, त्यांची नावे, पत्ता, फोन नंबर एकत्र मिळावेत यासाठी रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फॉउंडेशन ही स्वयंसेवी संस्था गेली काही वर्षे सोशल मीडियावर अभियान राबवत आहेत. 

जोपर्यंत स्वतःवर प्रसंग येत नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट गांभीर्याने न घेण्याच्या मानसिकतेमुळे या अभियानाला फारसा प्रतिसाद मिळत नाही; पण अमोल जगताप स्वतःच्या पातळीवर होईल ते प्रयत्न करत आहेत.
‘मी स्वतःपासून या उपक्रमाची सुरुवात केली आहे. याचा कित्ता सर्वांनी गिरवल्यास रक्ताचा तुटवडा कमी होईल. शिवाय आपल्यालाही एक चांगली सवय लागेल,’ असे अमोल जगताप म्हणतात.