चंद्रपूरच्या वाघांनो! नियोजन करा आणि स्पर्धा परीक्षेच्या युद्धाला सज्ज व्हा!!
चांदा क्लबवर हजारोंच्या उपस्थितीला विश्वास नांगरे पाटील यांनी दिले यशाचे गुरुमंत्र

चांदा क्लब ग्राउंडवर हजारोंच्या उपस्थितीत मिशन सेवा या उपक्रमाचा शानदार शुभारंभचंद्रपूर, दि. 16 जानेवारी -
उत्तुंग गुणवत्ता असतानादेखील साध्या सुविधा नसल्यामुळे अनेकांचे करिअर धोक्यात येते. मिशन सेवाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षारुपी वाघिणीचे दुध तुमच्यासाठी उपलब्ध केले आहे. त्यामुळे योग्य नियोजन करा, कठोर परिश्रमाची त्याला साथ द्या आणि यशाचा संकल्प करून चंद्रपूरच्या वाघांनो स्पर्धा परीक्षेच्या युद्धाला सज्ज व्हा, असे आवाहन विश्वास नांगरे पाटील यांनी केले.

जिल्हाभरातील शाळा-कॉलेजच्या युवकांचा हजारोचा समुदाय या महोत्सवासाठी आला होता. कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक तथा महाराष्ट्रातील तरुणाईचे स्पर्धा परीक्षांसाठी आयकॉन असलेले विश्वास नांगरे पाटील यांच्या व महाराष्ट्रातील अन्य वक्त्यांच्या स्पर्धा परिक्षेवरील प्रेरणादायी व्याख्यानासाठी ही हजारोंची गर्दी जमली होती.

यावेळी आपल्या हृदयस्पर्शी भाषणाने विश्वास नांगरे पाटील यांनी लोकांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्‍यांशी संवाद साधताना कोल्‍हापूरचे पोलिस उपमहानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील म्‍हणाले,


विश्वास नागरे पाटील यांनी नाविन्याचा ध्यास, गरीब वंचितांसाठी काम करण्याची पोटतिटिकीने आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या युवकांचा कायापालट करण्यासाठी ना. मुनगंटीवार यांनी मिशन सेवा सारख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यांनी यावेळी आपल्या स्पर्धा परीक्षाच्या प्रवासाची सुरुवात एका छोट्या गावात झाली असल्याचे सांगितले. चंद्रपूरच्या बछड्यांना स्पर्धा परीक्षा रुपी वाघिणीचे दुध ना.मुनगंटीवार देत आहेत. ही रानफुलांची भूमी आहे, या ठिकाणी विपरीत परिस्थितीत काहीतरी भव्यदिव्य करण्याची पार्श्‍वभूमी आहे. त्यामुळे निश्चितच या ठिकाणची मुले यश मिळवतील. मात्र त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी यशाची सूत्र सांगताना स्पष्ट केले की, काय करायचे? कसे करायचे?किती वेळेत करायचे? कोणते साहित्य घेऊन करायचे? याचे काटेकोर नियोजन मनात करणे गरजेचे आहे. आज मी यशस्वी आहे. मात्र दहावीमध्ये असताना सकाळी तीन वाजता उठून, थंड पाण्याने आंघोळ करून अभ्यासाला सुरुवात केली. आठवडाभर त्रास झाला. मात्र त्यानंतर पहाटेचे वाचलेले डोक्यात कायम बसण्याची ही वेळ झाली. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी जिल्ह्यामध्ये एक रचनात्मक आणि होकारात्मक वातावरण ना.सुधीर मुनगंटीवार यांनी निर्माण केले असून आता स्पर्धा परीक्षांसाठी आपण सज्ज व्हावे, असे आवाहन करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार नानाभाऊ शामकुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर, रुलर रिलेशनचे संस्थापक प्रदीप लोखंडे, सीजीएसटी मुंबईचे सहाय्यक आयुक्त राहुल गावंडे,लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन ईटनकर,अकोल्याचे उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते,जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर,उपवनसंरक्षक गजेंद्र अहिरे,बांबू संशोधन परीक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, अतिरीक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, उपमहापौर अनील फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांची उपस्थिती होती.

यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर यांनी देखील संबोधित केले. ते म्हणाले,स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी किमान दोन वर्षाची पूर्वतयारी आवश्यक आहे. हा वर्ष जुन्या प्रश्नपत्रिका चाळून घेणे खूप आवश्‍यक असून शासकीय पुस्तकांचे वाचन यामध्ये महत्त्वाचे ठरते. इंग्रजी वर्तमानपत्र व मराठी वर्तमानपत्र दोन्हीही वर्तमानपत्रांचे वाचन या परीक्षांसाठी आवश्यक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

सहाय्यक आयुक्त राहुल गावंडे हे मूळचे नागभीड तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्याचे असून ते सध्या केंद्रीय जीएसटी विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा युपीएससीमध्ये यशस्वी होऊ शकतो. मात्र हे स्वप्न उराशी बाळगतांना टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. एक पुस्तक अनेकवेळा वाचण्याची व गतीने वाचण्याची सवय लावावी असेही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. चंद्रपूर जिल्ह्यातून 70 वर्षांमध्ये आपण 70 देखील अधिकारी देऊ शकलो नाही. त्यामुळे ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या मोहिमेचा लाभ घेऊन आता अधिकाधिक अधिकारी आपल्या जिल्ह्यातून तयार व्हावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

अकोल्याचे उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते यांनी देखील यावेळी संबोधित केले. मोहिते यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही कालावधी गेल्यानंतर समाज व परिवारातून आणखी किती वर्षे तयारी करणार असे प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आपण एकाग्रचित्ताने आपले मार्गक्रमण करत राहावे, असे स्पष्ट केले. ते म्हणाले आठ ते दहा तास मनापासून जर तुम्ही कष्ट करत असाल तर यश तुम्हाला निश्चित मिळेल. जाहिरातीची वाट बघून तुमचा अभ्यास सुरू झालेला नसतो आणि नसावा त्यामुळे चांगल्या मित्रांची साथ घ्या, ग्रुप डिस्कशन करा जास्तीत जास्त वाचन करा, आत्मचरित्र ललित लेखन वाचा, सामाजिक विषयावरचे पिक्चर बघा, सहलीला जा यातून एक दृष्टी मिळत राहते. या दृष्टीचा आपल्याला सामाजिक, भौगोलिक परिस्थिती समजण्यासाठी मदत होते. ज्यांना परीक्षेमधून नोकरी लागेल त्यांनी मात्र मित्र आपल्या सोबत परीक्षेची तयारी करत होते. त्यांना मार्गदर्शन करा त्यांना आर्थिक दायित्व द्या.

ग्रामीण भागामध्ये ग्रंथालयाचे जाळे निर्माण करणारे रुलर रिलेशनचे संस्थापक प्रदीप लोखंडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अतिआत्मविश्वास नको केवळ आत्मविश्वास ठेवा, मन लावून अभ्यास करा, इतरांच्या चरित्राची, त्यांच्या यशाची, कारण मीमांसा व त्यावर चर्चा करण्याऐवजी आपल्या अभ्यासाची गती वाढवून यश मिळविण्याकडे लक्ष द्या असे त्यांनी सांगितले स्वतःला स्वतः घडवणे हे स्पर्धा परीक्षा मध्ये सर्वात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या मार्गदर्शनानंतर जवळपास एक तास विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे या अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार हे देखील स्वतः सहभागी झाले होते. जिल्ह्यामध्ये उपलब्ध असणाऱ्या ग्रंथालयाच्या अभ्यासिकाची वेळ वाढवण्यात यावी, ग्रंथालय निर्माण करण्यात यावे, अशा सूचना झाल्या. विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न यावेळी विचारले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन एकता बंडावार व कल्पना बन्सोड यांनी केले. तर आभार संयोजिका स्नेहा मेघावत यांनी केले.