"पेस" (पँरेंट्स असोसिएशन फॉर चिल्ड्रेन एज्युकेशन) तर्फे बुक एक्सचेंज (पुस्तकांची अदलाबदल) कार्यक्रम


"पेस" तर्फे सामाजिक जाणिवेचे भान राखून पर्यावरणपूरक उपक्रम, "जुन्या पुस्तकांची अदलाबदल" आज दिनांक १२ मे २०१९ ला माता मंदिर, जुने आर. टी. ओ. ऑफिस, रामनगर, चंद्रपूर येथे सकाळी ९:०० ते ११:०० या वेळेत घेण्यात आला. या कार्यक्रमाला जवळपास दोनशे ते अडीचशे पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन, आपले मागील वर्षीचे जुने पुस्तके देऊन चालू वर्षाचे जुने पुस्तके नेली.
जुने पुस्तके अदलाबदल मागील "पेस" ची भूमिका:बुक एक्सचेंज कार्यक्रम हा "पेस" तर्फे पर्यावरण संवर्धन करण्यासाठी पालकांना आणि पाल्याना जागृत करण्यासाठी तसेच वृक्ष संवर्धनाचे महत्व विशद करण्यासाठी राबविण्यात आलेला कार्यक्रम आहे.
पूर्वीच्या काळात जेव्हा शिक्षणाचे आजच्या सारखे बाजारीकरण झाले नव्हते तेव्हा अशी पुस्तकाची अदलाबदल प्रचलित होती, त्यावेळी शाळा सुद्धा अश्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत होत्या. परंतु, शिक्षणाचे जसेजसे बाजारीकरण झाले तसे तसे शाळा व पुस्तक विक्रेते यांचे लागेबांधे जुळले व यातून अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. कॉन्व्हेंट संस्कृती ने पुस्तक अदलाबदली ला पूर्णपणे बंद केले. त्याचवेळी पालकांचे उत्पन्न सुद्धा वाढले त्यामुळे पालकांनीसुद्धा याकडे पाठ फिरवली.आज एक पुस्तक तयार करायला एक पूर्णपणे वाढ झालेल्या झाडाची कत्तल केली जाते. आपल्यापैकी किती पालक दरवर्षी एक तरी झाड लावतात? आणि लावतात तर त्यातील किती झाडांचे संगोपन करतात याचे उत्तर खूप कमी किंवा नाहीच? असे आहे. जेव्हा आपण एक झाड लावून जगवू तर शकतच नाही, मग किमान आपण नवीन पुस्तके न घेता जुने पुस्तके वापरून  पूर्णपणे वाढ झालेल्या काही झाडांची कत्तल  होण्यापासून तर थांबवू शकतो. अश्या प्रकारे करोडो नवीन पाठ्यपुस्तकांसाठी होणारी करोडो झाडांची कत्तल तर आपल्याला थांबवता येईल, आणि अप्रत्यक्षरीत्या  वृक्ष संवर्धनाला हातभार लावता येईल हा या कार्यक्रमाच्या मागील उद्देश आहे. यात पालकांची भूमिका फार महत्वाची आहे. आपल्या मुलांना समजावून सांगावे की जुने पुस्तक वापरणे हे गरिबीचे लक्षण नसून पर्यावरण पूरक दृष्टिकोनाचे द्योतक आहे. मोठमोठे आंतरराष्ट्रीय विद्यापीठसुद्धा उदा. ऑक्सफर्ड, केम्ब्रिज हे सुद्दा बुक एक्सचेंज प्रोग्राम राबवीत असतात, मग आपण का नाही..?
सदर कार्यक्रमाला "पेस" चे पदाधिकारी आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते.