जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहनचंद्रपूर, :  महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी झाली असतानाही कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याबाबत तक्रारी प्राप्त होत असून या तक्रारी सोडवण्यासाठी सहकार विभागातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तरी कर्जदार शेतकऱ्यांनी 6 मे  ते 17 मे 2019 दरम्यान राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डी. आर. खाडे यांनी केले आहे.
दिनांक 28 जून 2017 रोजीचे शासन निर्णयाद्वारे कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली होती. यानंतर दिनांक 9 मे 2018 चे शासन निर्णयानुसार या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली. त्यानुसार 1 एप्रिल 2001 ते 30 जून 2018 दरम्यान कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण जात असल्याने ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 15 जून 2018 पर्यंत वाढविण्यात आली होती. आतापर्यंत या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1 लक्ष 19 हजार 743 शेतकऱ्यांना 468 कोटी रुपयाच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. तरीसुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याबाबत कार्यालयाला तक्रारी प्राप्त होत आहे. म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालय चंद्रपूर मार्फत दिनांक 6 मे ते 17 मे 2019 दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
   तरी ज्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँक, खासगी बँक, ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती बँक कडून 1 एप्रिल 2001 ते 30 जून 2016 यादरम्यान कर्ज घेतलेले आहे, तसेच ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला आहे. अशा शेतकऱ्यांनी तालुक्याच्या सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात पुराव्यासहित सुनावणी साठी उपस्थित राहावे, अशी सूचना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आलेली आहे.
  तसेच शेतकऱ्यांनी सुनावणीसाठी येताना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज केल्याचा पुरावा, कर्जमाफी संबंधाने कर्जाबाबत शासन निर्णयात उल्लेख केलेल्या कर्जप्रकारात मोडत असल्याबाबतचा पुरावा, कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याचा पुरावा सोबत आणावा. 6 मे ते 15 मे दरम्यान राबविण्यात येणाऱ्या मोहिमेकरिता शेतकऱ्यांच्या सोयीचे व्हावे या दृष्टिकोनातून तालुका निहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यात चंद्रपूर तालुक्यासाठी सहकारी अधिकारी पी. डब्ल्यू. भोयर, वरोरा तालुका सहकारी अधिकारी कु. एस.जी. परचाके, भद्रावती करिता मुख्य लिपिक व्ही. ई. सानप , चिमूर तालुका सहाय्यक निबंधक आर. एन. पोथारे, नागभीड साठी सहाय्यक निबंधक कु. एम.बी. उईके, सिंदेवाही करिता सहकारी अधिकारी कु. एस. एम. शिंदे, मूल तालुक्याकरीता सहकारी अधिकारी आर.डी. कुमरे, ब्रह्मपुरी तालुक्याकरीता एस. एम. फुटाणे, सावली तालुका डी.आर. नवघरे, पोंभूर्णा तालुका सी. एच. उघडे, गोंडपिपरी करिता पी. एस. धोटे, बल्लारपूर करिता एम.डी. मेश्राम, राजुरा तालुक्याकरीता एस. एस. तुपट आणि कोरपना व जिवती तालुक्याकरीता मुख्य लिपिक यू. आर. पहुरकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या तालुका ठिकाणच्या  सहाय्यक निबंधक कार्यालयातील  नियुक्त अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची कर्ज माफी संदर्भात सुनावणी घेण्यासाठी निर्देश देण्यात आले आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे