जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व सिंदेवाही तालुक्यात आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू करा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार




चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व सिंदेवाही तालुक्यात आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू करा - पालकमंत्री विजय वडेट्टीवार

चंद्रपूर : दिनचर्या न्युज :-

जगभरात खळबळ माजवणाऱ्या कोरोना विषाणूजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व सिंदेवाही तालुक्यात आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू कराव्या. मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, एकही गोर-गरीब उपाशी राहू नये, सर्वांना पोटाला पोटभर अन्न मिळावे यासाठी भोजनाची व्यवस्था करावी, अन्न धान्याचे वाटप तातडीने सुरू करावे असे निर्देश चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला दिले.
कोरोना या विषाणूजन्य आजारा विषयीच्या आढावा घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे शासकीय विश्रामगृह आणि सिंदेवाही येथील तहसील कार्यालयात बैठक घेतली.या बैठकीस ब्रम्हपुरीचे उपविभागीय अधिकारी महसूल क्रांती डोंबे, पोलीस विभागाचे शिंदे, तहसीलदार पवार, मख्याधिकारी वासेकर, डॉ खलाटे, सिंदेवाहीचे तहसीलदार जगदाळे, मुख्याधिकारी सुप्रिया राठोड, यासह संबधित यंत्रणेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
कोरोना या रोगाचे गांभीर्य लक्षात घेत ब्रम्हपुरी व सिंदेवाही या तालुक्यांमध्ये निर्जंतुकरणं फवारणी प्रामुख्याने करण्यात यावी असे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देताना श्री. वडेट्टीवार म्हणाले,कोरोना नावाचे विघातक संकट देशासह राज्यावर आले असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशानाच्या सूचनांचे पालन करावे , विना कारण घराबाहेर पडू नये, घरातच राहून स्वतःची व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन श्री. वडेट्टीवार यांनी नागरिकांना  केले.या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे  बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी पालकमंत्र्यांनी स्वतःकडून मोफत मास्कचे वाटप करण्यात आले. ही बैठक ठराविक अंतर ठेऊनच संपन्न झाली.या बैठकीदरम्यान दोन्ही तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.