जिल्हा ग्रीन झोनमध्येच ; राज्य शासनाकडून अधिकृत निर्देशाची वाट





घाबरू नका ! स्थलांतरितासाठी
जिल्हा प्रशासनाचे नियोजन तयार होत आहे

जिल्हा ग्रीन झोनमध्येच ; राज्य शासनाकडून अधिकृत निर्देशाची वाट

✨ जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
✨ दाखल होणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी
✨ तेलंगाणा सीमेवर आलेल्या नागरिकांना आपापल्या गावी पाठविणार
✨ सुशिक्षितांनी शक्यतो गुगल फॉर्म भरून आपली माहिती द्यावी
✨ पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक तलाठी व आशा वर्कर यांना जबाबदारी

चंद्रपूर दि. २ मे : परराज्यातील नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी व राज्य अंतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या चंद्रपूरच्या नागरिकांना स्वगृही परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. संपर्क क्रमांक व गुगल फॉर्मवर आपली माहिती देण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून त्यानंतर राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार प्रत्येकाला आपल्या गावी पोहोचविले जाईल. मात्र यासाठी कोणतीही गडबड करू नये. हजारो लोकांच्या स्थलांतराचा हा प्रश्न असल्याने पुढील काही दिवसात याबद्दलचे नियोजन पूर्ण होईल व त्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल. त्यासाठी संयम बाळगावा ,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील तीन रहिवाशी हे इतर जिल्ह्यांमध्ये कॉरेन्टाइन करण्यात आले आहे. एक दिल्लीमध्ये व दोन नागपूरमध्ये. अन्य ठिकाणी या तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह होता. त्यांचा मूळ रहिवासी पत्ता हा चंद्रपूर असल्यामुळे केंद्र शासनाच्या अहवालात जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये तांत्रिकदृष्ट्या दाखविण्यात येत आहे. मात्र कोरोना संसर्ग काळामध्ये जिल्ह्याच्या सीमेच्या आत एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडून अधिकृत दिशानिर्देश येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोणताही संभ्रम ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.
शक्य असेल तर गुगल फॉर्म भरा:
बाहेर जिल्ह्यात, राज्यात अडकलेल्या नागरिकांनी ज्या जिल्ह्यात ते अडकले आहेत. त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाची,तालुका प्रशासनाची संपर्क साधणे आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यात अडकून पडलेले आहात त्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क साधला जाणार आहे. त्याचप्रमाणे या जिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांबाबतही अन्य राज्यांना व जिल्ह्यांना माहिती प्रशासनामार्फत दिली जात आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वप्रथम ते ज्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्या प्रशासनाकडे आपली माहिती देणे गरजेचे आहे.
ज्या जिल्ह्यात,राज्यात ज्या ठिकाणी अडकले आहेत. त्या प्रशासनाला माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडून प्रवास करण्याविषयी परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याठिकाणी वैद्यकीय तपासणी देखील प्रवाशांची केली जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे प्रवासाची परवानगी मिळणार आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून 24 तास संपर्क करण्यासाठी हेल्पलाइन नंबर जाहीर केले आहेत. जिल्हा प्रशासनाने यासाठी 5 दूरध्वनी लाईन सुरू केल्या असून 07172-274166,67,68,69,70 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पुणे-मुंबई व इतर शहरांमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यासाठी वरील क्रमांकावरचआपली माहिती द्यावी.
बाहेर जिल्ह्यात,राज्यात अडकलेल्या नागरिकांनी शक्यतो chanda.nic.in या संकेत स्थळावर जाऊन संबंधित दिसणाऱ्या बॅनरला क्लिक करून गुगल फॉर्म उघडेल. या गुगल फॉर्म मध्ये विचारलेली आवश्यक माहिती भरावी किंवाchandrapurhelpdesk@gmail.com या इमेल वर सुद्धा संपर्क साधता येणार आहे.
दरम्यान पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी विशेष कार्य अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या मुख्य समन्वयात ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, बल्लारपूर, पोंभुर्णा या 5 तालुक्यांसाठी श्री. प्रदीप गद्देवार (8007203232).मुल, नागभीड, राजुरा, कोरपना, चिमूर या तालुक्यांसाठी श्री. उमेश आडे (9404235449). चंद्रपूर, वरोरा, जिवती,गोंडपिंपरी,भद्रावती तालुक्यासाठी श्री. सुधीर पंदीलवार (9175991100) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात येणार्‍या प्रत्येकाची तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी चेक पोस्टवर याशिवाय गावांमध्ये परत आल्यानंतर केली जाणार आहे. यासाठी संबंधित गावांच्या ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, पोलिस पाटील, आशा वर्कर ,यांना अवगत करण्यात आले आहे. ज्यांना कोणतेही लक्षण नाही. त्यांना होम कॉरेन्टाइन करायचे आहे. होम कॉरेन्टाइन न पाळणाऱ्या व्यक्तींवर प्रसंगी फौजदारी कारवाई देखील केली जाईल. आर्थिक दंड देखील केला जाईल. प्रसंगी संस्थात्मक कॉरेन्टाइन करण्यात येईल.या नागरिकांच्या घरावर स्टिकर देखील लावले जाणार आहे. मात्र गावात येणाऱ्या या नागरिका बाबत अन्य लोकांनी देखील सामंजस्याची भूमिका घ्यावी. हे नागरिक जवळपास एक महिना लॉकडाऊनमध्ये कोणत्याही आजाराशिवाय राहिलेले आहेत.मात्र त्यांनी कोणतेही लक्षण दिसले तर प्रशासनाला कळवावे व घरी राहण्यासाठी सांगितले असल्यामुळे गावात आल्यानंतर 14 दिवस घरातच राहावे, असे स्पष्ट निर्देश आज जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
जिल्हा प्रशासन प्रत्येक राज्याच्या संपर्कात आहे. तेलंगाना मधून काही मजूर मोठ्या प्रमाणात राज्याच्या सीमेवर चंद्रपूर जिल्ह्याच्या बॉर्डरवर आलेले आहेत. या सर्व मजुरांना आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे त्यांना चेक पोस्टवर तपासून त्यांच्या गावापर्यंत पाठविण्याची व्यवस्था केली जात आहे.