संतश्रेष्‍ठ संताजी जगनाडे महाराज यांच्‍या स्‍मृती जोपासण्‍याची संधी लाभली यासाठी मी भाग्‍यवान – आ. सुधीर मुनगंटीवार





संतश्रेष्‍ठ संताजी जगनाडे महाराज यांच्‍या स्‍मृती जोपासण्‍याची संधी लाभली यासाठी मी भाग्‍यवान – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूरातील जटपुरा वार्डात संताजी जगनाडे महाराज सभागृहाचे व अन्य विकासकामांचेवउदघाटन संपन्‍न

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
संत तुकाराम महाराज यांचे पट्टशिष्‍य संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज हे आमचे श्रध्‍दास्‍थान आहे. संताजी जगनाडे महाराज यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ टपाल तिकीट प्रकाशित करण्‍यासाठी मी केंद्र सरकारच्‍या स्‍तरावर यशस्‍वी संघर्ष करू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे. संताजी जगनाडे महाराज यांचे जन्‍मगांव पुणे जिल्‍हयातील सदुंबरे या गावाला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्‍यासाठी सुध्‍दा मी यशस्‍वी प्रयत्‍न केले. नागपूर येथे संताजी जगनाडे महाराज यांचे स्‍मारक उभारण्‍यासाठी नागपूर सुधार प्रन्‍यासला अर्थमंत्री पदाच्‍या काळात १ कोटी रू. निधी मंजूर करविला. तेली समाजातील पोटजातींना ओबीसीचे प्रमाणपत्र मिळण्‍यासाठी मी विधानसभेच्‍या माध्‍यमातुन यशस्‍वी प्रयत्‍न केले. पोंभुर्णा येथे संताजी जगनाडे महाराज स्‍मृती सभागृहासाठी निधी मंजूर केला. लोकप्रतिनिधी म्‍हणून वेळोवेळी या संतश्रेष्‍ठाच्‍या स्‍मृती जोपासण्‍याची संधी मला मिळाली या अर्थाने मी स्‍वतःला भाग्‍यवान समजतो, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक २५ सप्‍टेंबर २०२१ रोजी चंद्रपूर शहरातील जटपुरा वार्डातील पंचतेली हनुमान मंदीर परिसरातील सभामंडप, बालोद्यान तसेच मित्रनगर चौक सौंदर्यीकरणाच्‍या लोकार्पण सोहळयात तसेच संताजी जगनाडे महाराज सभागृहाचे उदघाटन समारंभात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी महापौर सौ. राखी कंचर्लावार, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, मनपा सभागृह नेते संदीप आवारी, माजी महापौर सौ. अंजली घोटेकर, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोटटूवार, प्रकाश धारणे, मनपा गटनेता जयश्री जुमडे तसेच जटपुरा प्रभागाचे नगरसेवक सौ. छबू वैरागडे, अॅड. राहूल घोटेकर, शितल आत्राम यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात चंद्रपूर शहराच्‍या विकासासाठी कधी नव्‍हे इतका निधी आपण मंजूर करविला. या शहराचा चेहरा मोहरा बदलवत अनेक महत्‍वपूर्ण विकासकामे पूर्णत्‍वास आणली. चंद्रपूर शहरात १० पेक्षा अधिक बालोद्यानाची निर्मीती आपण केली. पंचतेली हनुमान मंदीराला सर्वशक्‍तीनिशी आपण मदत करणार असल्‍याचे आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. नगरसेविका सौ. छबू वैरागडे यांच्‍या कार्यशैलीचे त्‍यांनी विशेष कौतुक केले. यावेळी महापौर सौ. राखी कंचर्लावार यांचेही भाषण झाले. चंद्रपूर शहराच्‍या सर्वांगिण विकासासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कटिबध्‍द असल्‍यचे प्रतिपादन महापौरांनी यावेळी केले. प्रास्‍ताविकपर भाषण प्रभाातील नगरसेविका तथा झोन सभापती सौ. छबू वैरागडे यांनी केले. आम्‍ही सुधीरभाऊंकडे विकासासंदर्भात जी जी मागणी केली सुधीरभाऊंनी ती प्राधान्‍याने पूर्ण केली. नागरिकांनी विकासाबाबत मागणी करायची आणि सुधीरभाऊंनी ती पूर्ण करायची असे समीकरणच चंद्रपूर महानगरात निर्माण झाले आहे. त्‍यांच्‍या नेतृत्‍वात आम्‍ही सदैव जनसेवा करू असेही सौ. छबू वैरागडे म्‍हणाल्‍या. कार्यक्रमाचे संचाजन प्रज्ञा जीवनकर यांनी केले.
कार्यक्रमाला सर्व भाजपा नगरसेवक, नगरसेविका, भाजपा पदाधिकारी, पंचतेली हनुमान मंदीराचे पदाधिकारी, ज्‍येष्‍ठ नागरिक यांची उपस्थिती होती