विविध अधिकार मिळावे यासाठी जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनची स्थापना
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
लोकसभा व विधानसभा हे कायदेमंडळ असुन त्यांनी निर्माण केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हापरिषद , पंचायत समिती व ग्रामपंचायत या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची रचना करण्यात आली आहे. पण अजुनही या त्रिस्तरीय व्यवस्थेला कायदेशीर अधिकार देण्यात आलेले नाहीत. जि.प. व पं.स. सदस्यांना सन्मानजनक मानधन देण्यासह त्यांना विविध अधिकार मिळावे यासाठी महाराष्ट्रात जिल्हापरिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशन ची स्थापना करण्यात आली असल्याचे प्रतिपादन करीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दौरा सुरु असल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. कैलास गोरे पाटील यांनी चंद्रपूर येथील जिल्हास्तरीय बैठकीत सांगीतले .
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या कर्मवीर मा.सा.कन्नमवार सभागृहात संघटनेची जिल्हास्तरीय बैठक संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. कैलास गोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा रत्नागिरी जि.प.उपाध्यक्ष उदय बने , राज्य उपाध्यक्ष जय मंगल जाधव , राज्य सरचिटणीस सुभाष घरत, वर्धा जि.प.अध्यक्षा तथा संघटनेच्या विभागीय महिला आघाडी प्रमुख सौ.सरिताताई गाखरे , चंद्रपूर जि.प.उपाध्यक्ष सौ.रेखाताई कारेकर , जि.प.माजी अध्यक्ष तथा भाजपा गटनेते देवराव भोंगळे , माजी अध्यक्ष व कांग्रेस गटनेते डॉ. सतिश वारजुकर , समाजकल्याण सभापती नागराज गेडाम , कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे , बांधकाम व अर्थ सभापती राजु गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणारे जि.प. व पं.स.सदस्य हे कायदेशीर अधिकार नसल्याने ओसाड गावचे पाटील असल्याची टीका करीत या सदस्यांच्या अधिकारासाठी व हक्काच्या मागण्यांसाठी आक्टोबर महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे राज्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले .उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जि.व व पं.स. सदस्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी राज्यस्तरीय समारंभात पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचेही राजाध्यक्ष कैलास गोरे पाटील यांनी यावेळी सांगितले. संघटनेचे कार्याध्यक्ष उदय बने यांनी जिल्हापरिषदेतील आपल्या २५ वर्षातील जि.प.सदस्य म्हणुन काम करीत असतांना आलेल्या अनुभवांची शिदोरी विषद करुन पंचायत राज व्यवस्थेतील अनेक कायदे व कामांची माहिती देत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार हा मतदार असावा , जि.प.व पं.स.सदस्यांचे गट व गण आरक्षण हे १० वर्षासाठी असावे , जिल्हा परिषद अध्यक्ष व पं.स.सभापती यांचे बदलीचे अधिकार पुर्ववत करावे , सदस्यांचे मानधन वाढवावे यासह विविध प्रकारच्या मागण्या यावेळी उपस्थित सदस्यांपैकी ब्रिजभुषण पाझारे , खोजराम मरसकोल्हे, रमाकांत लोधे , डॅा.आसावरी देवतळे, महेश देवकाते, रामलाल दोनाडकर , प्रविण ठेंगणे , तुकाराम ठिकरे यांनी पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. ह्या मागण्या राज्यभरातून लोकप्रतिनिधींकडुन येत असल्याने शासनदरबारी पोहचवुन याचा पाठपुरावा संघटनेमार्फत करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यासाठी लवकरच केंद्र व राज्य सरकारच्या मंत्रीमहोदयांसमवेत बैठक आयोजित करणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी सर्वच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समयोचित मार्गदर्शन करीत संघटनेच्या माध्यमातून सदस्यांच्या न्याय हक्कासाठी एकत्रित येण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी देवराव भोंगळे यांची संघटनेच्या राज्य सहसंघटक पदी , सतिश वारजुकर यांची विभागीय कार्याध्यक्ष पदी व संजय गजपुरे यांची चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्तीची घोषणा राज्याध्यक्ष डॉ. कैलास गोरे पाटील यांनी केली व त्यांचे स्वागत केले. या बैठकीचे प्रास्ताविक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. सतिश वारजुकर यांनी मानले. बैठकीचे संचलन पराग भानारकर यांनी उत्कृष्ट रित्या केले. बैठकीला जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील जि.प. व पं.स. सदस्य व सभापतींची उपस्थिती होती.
दिनचर्या न्युज