स्थायी समिती सभापतीपदासाठी ९ नामनिर्देशन पत्रांची उचल





स्थायी समिती सभापतीपदासाठी
९ नामनिर्देशन पत्रांची उचल



दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, ता. ९ : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक ११ ऑक्टोबरला होणार आहे. त्यासाठी शनिवार (ता. ९) पासून निवडणूक कार्यक्रम सुरु झाला आहे. स्थायी समिती सभापतीपदासाठी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मनपा नगरसचिव यांच्या कार्यालयातून एकूण ९ कोरे नामनिर्देशन पत्राची उचल झाली.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २१(१) (५) तरतुदी अन्वये स्थायी समितीच्या सदस्यांतून सभापती यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांच्याकडील पत्रानुसार स्थायी समितीची विशेष बैठक पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार ता. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत दुसरा माळा, राणी हिराई सभागृहात होत आहे. उद्या रविवार, ता. १० रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येईल. ११ रोजी सकाळी ११ वाजता सभा सुरु झाल्यावर नामनिर्देशन पत्राची छाननी होईल. त्यानंतर १५ मिनिटाच्या कालावधीत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार मतदान होईल.


महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापतीपदासाठी ५ अर्जाची उचल

महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापतीपदाची निवडणूक ११ ऑक्टोबारला होणार आहे. त्यासाठी एकूण ५ कोरे नामनिर्देशन पत्राची उचल करण्यात आली. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत दुसरा माळा, राणी हिराई सभागृहात विशेष बैठक होत आहे. यात या दोन्ही पदासाठी निवड होईल. दरम्यान, १० रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे.