राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची उपोषण मंडपाला भेट




राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची उपोषण मंडपाला भेट.

वाघ, बिबट जेरबंद करणे संदर्भात घेतली उच्चस्तरीय बैठक

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- दुर्गापुर, ऊर्जानगर व लगतच्या परिसरात मागील अनेक महिन्यांपासून वाघ, बिबट्या व अस्वल यांचा मानवी वस्तीत मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला होता.
मागील काही महिन्यात झालेल्या या प्राण्याच्या हल्ल्यात या परिसरातील जवळपास ७ ते ८ सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.
म्हणून या हिंस्त्र प्राण्यांना जेरबंद करण्यात यावे याकरिता वन विभाग चंद्रपूर यांच्याकडे वारंवार प्रत्यक्ष भेटून निवेदने देऊन मागणी करण्यात आली होती, परंतु वनविभागातर्फे कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाही.

दिनांक १६ व १७ फेब्रुवारी २०२२ या सलग दोन दिवशी या परिसरातील २ नागरिकांचा या प्राण्याच्या हल्ल्यात जीव गेला व म्हणुन जिल्ह्याचे संपर्कमंत्री माननीय श्री प्राजक्त तनपुरे साहेब यांना या गंभीर विषया संदर्भात बैठक घेण्याची विनंती करण्यात आली होती.

त्या अनुषंगाने आज मा. प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मा. जिल्हाधिकारी, मा. पोलीस अधीक्षक, मा. मुख्य अभियंता चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, मा. मुख्य वनसंरक्षक वनवृत्त चंद्रपूर या सर्वांची बैठक घेण्यात आली असून यात या परिसरातील वाघांना जेरबंद करण्यासंदर्भात ज्या काही उपाययोजना आहे तात्काळ राबविणे संदर्भात निर्देश देण्यात आले. तसेच शासन स्तरावरील ज्या काही परवानगी आहे त्या तात्काळ देण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

मा. तनपुरे यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने या सगळ्या प्रक्रियेला वेग आलेला असून सर्व स्तरावरील हालचाली मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे. यानंतर स्वतः मा. प्राजक्त तनपुरे यांनी महानिर्मिती व वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह हल्ला झालेल्या परिसराची पाहणी केली.

बैठक झाल्यानंतर राज्यमंत्री मा.ना.श्री. प्राजक्त तनपुरे साहेब यांनी स्वतः नितीन भटारकर यांच्या उपोषणस्थळी येऊन परिसरातील सर्वसामान्य नागरिक तसेच विविध पक्षातील नेते व पदाधिकारी यांना लवकरात लवकर या वाघांना जेरबंद करण्यात येईल असे आश्वस्त केले तसेच या सर्व प्रक्रियेवर स्वतः लक्ष देऊन कोणत्याही स्वरूपाची शासन स्तरावरील परवानगी थांबणार नाही अशी ग्वाही दिली.

दिनचर्या न्युज