ऊर्जानगर, दुर्गापूर परिसरातील वाघांचा तातडीने बंदोबस्‍त करा – आ. सुधीर मुनगंटीवार





ऊर्जानगर, दुर्गापूर परिसरातील वाघांचा तातडीने बंदोबस्‍त करा – आ. सुधीर मुनगंटीवार

आ. मुनगंटीवार यांनी घेतली जिल्‍हाधिकारी व संबंधित अधिका-यांची बैठक.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूरातील ऊर्जानगर, दुर्गापूर परिसरात वाघांचा व अन्‍य वन्‍यप्राण्‍यांचा वावर मोठया प्रमाणात वाढला आहे. त्‍याचाच परिणाम म्‍हणून गेल्‍या दोन दिवसात त्‍या परिसरात वाघाने दोघांचा बळी घेतला ज्‍यामध्‍ये एका १६ वर्षाच्‍या मुलाचा समावेश आहे. या घटना अतिशय दुर्देवी असून वनविभागाने ऊर्जानगर परिसर तात्‍काळ नो टायगर झोन घोषीत करावा व त्‍या परिसरातील वाघांना पकडून त्‍यांचे दुसरीकडे पुनर्वसन करावे असे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

आज या विषयावर जिल्‍हाधिकारी कार्यालयात एका महत्‍वाच्‍या बैठकीचे आयोजन आ. मुनगंटीवार यांनी केले. या बैठकीला मा. जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने, मुख्‍य वनसंरक्षक एन. प्रविण, वनसंरक्षक रामगांवकर, वनविकास महामंडळाचे प्रमुख अनारसे, चंद्रपूर महाऔष्‍णीक विद्युत केंद्राचे मुख्‍य अभियंता पंकज सपाटे, वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे अधिकारी, भाजपा नेते रामपाल सिंह, जिल्‍हा परिषद महिला बालकल्‍याण समिती सभापती रोशनी खान, जिल्‍हा परिषद सदस्‍या वनिता आसुटकर, भाजपा तालुकाध्‍यक्ष हनुमान काकडे, नामदेव आसुटकर, विलास टेंभुर्णे, पंचायत समिती सभापती केमा रायपुरे व अन्‍य पदाधिकारी यांची उपस्थिती होती.


आ. मुनगंटीवार यांनी या विषयाला सर्वसंबंधित विभागांनी अतिशय गांभीर्याने घेण्‍याचे निर्देश अधिका-यांना दिले. चंद्रपूर महाऔष्‍णीक विद्युत केंद्राने वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यापासून वाचण्‍यासाठी सिसी टिव्‍ही कॅमेरे व सेंसर सिस्‍टीम बसवावी तसेच आजुबाजूला वाढलेली झुडपे काढण्‍याचे काम तातडीने सुरू करावे असेही आ. मुनगंटीवार यांनी सांगीतले. सध्‍या असणा-या भितीमुळे विद्युत केंद्राच्‍या प्रमुख गेटपासून आतपर्यंत जाण्‍यासाठी बसची व्‍यवस्‍था करावी असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. या कामात भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांनी आपल्‍या चमु बनवून संबंधित विभागांना मदत करावी. श्री. सपाटे यांनी झुडपे काढण्‍याचे काम वेगाने सुरू असल्‍याचे सांगीतले. तसेच आ. मुनगंटीवार यांनी संरक्षक भिंत बांधण्‍याच्‍या कामाचा वेग वाढविण्‍याचे निर्देश दिले.

मध्‍यप्रदेशच्‍या धर्तीवर इंटलीजंट कॅमेरा टेक्‍नॉलॉजी याचा अभ्‍यास करून असे कॅमेरे ताबडतोब लावावे. या कॅमे-यांमध्‍ये अशी व्‍यवस्‍था आहे की त्‍या कॅमे-याजवळ कुठलाही वन्‍यप्राणी आला तर त्‍याचा एसएमएस संबंधित आरएफओला जाईल व तिथे सायरन वाजण्‍यास सुरूवात होईल. ज्‍यामुळे त्‍या प्राण्‍याची येण्‍याची सुचना वनविभागाला व आसपासच्‍या नागरिकांना मिळेल. या सिस्‍टीमचा प्रस्‍ताव ताबडतोब वनविभागाला पाठवावा असे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी वनविभागाच्‍या अधिका-यांना दिले. यासंबंधात केंद्र सरकारच्‍या आयटी विभागाला पत्र पाठवून इंटलीजंट कॅमेरा टेक्‍नॉलॉजी यासंबंधात अद्ययावत माहिती मागवावी असेही निर्देश यावेळी आ. मुनगंटीवार यांनी दिले. वेकोलिच्‍या भागात वाढलेली झुडपे ताडबतोब काढण्‍याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी वेकोलि अधिका-यांना दिले. आ. मुनगंटीवार यांनी वनविभागाचे प्रमुख सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्‍य वनसंरक्षक श्री. लिमये या दोघांशी दुरध्‍वनीवरून संवाद करत त्‍यांनाही या प्रसंगाचे गांभीर्य सांगून यावर ताबडतोब उपाययोजना करण्‍याचे निर्देश दिले. याप्रसंगी मा. जिल्‍हाधिकारी यांनी सुध्‍दा सर्व अधिका-यांना या विषयावर तातडीने कारवाई करण्‍याचे निर्देश दिले. आ. मुनगंटीवार यांनी मा. मुख्‍यमंत्री उध्‍दवजी ठाकरे, वन राज्‍यमंत्री ना. दत्‍तात्रयजी भरणे, मुख्‍यमंत्र्यांचे सचिव मा. विकास खारगे या सर्वांशी बोलण्‍याचे आश्‍वासन दिले.

दिनचर्या न्युज