नरभक्षक झालेल्या वाघ व बिबट्यांना तात्काळ जेरबंद करण्याच्या संदर्भाने उच्चस्तरीय बैठक घ्यावी :- उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचेकडे नितीन भटारकर यांची मागणी






चंद्रपूर जिल्ह्यातील नरभक्षक झालेल्या वाघ व बिबट्यांना तात्काळ जेरबंद करण्याच्या संदर्भाने उच्चस्तरीय बैठक घ्यावी :- उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचेकडे नितीन भटारकर यांची मागणी.

चंद्रपूर जिल्ह्यातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेली मनुष्यहानी, पशुहानी व शेतपीक नुकसान याकरिता देण्यात येणारी भरपाईची रक्कम वनविभागाकडे नसल्याने २ कोटी रुपये मंजुर करून वनविभागाला द्यावे.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात सध्या वन्यप्राण्यांने धुमाकूळ घातला असून दररोज अनेक तालुक्यात एक ना एक जीव जात आहे. आतातर काही महिन्यांपासून शहराला लागून असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, उर्जानगर, डब्ल्यु.सी.एल. कॉलनी, दुर्गापूर व लगतच्या नेरी-कोंढी परीसरात वाघ, बिबट व अस्वल यांच्या संख्येत वाढ होऊन राहिवासी वस्त्यांमध्ये फिरत आहे. वन विभागाने तात्काळ उपायोजना कराव्या याकरीता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर हे मागील ३ वर्षांपासुन वनविभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करीत होते. मात्र सन २०१९ पासुन देण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने वनविभागातर्फे पाहिजे त्याप्रमाणात सकारात्मक कार्यवाही करण्यात आली नव्हती.

जिल्ह्यात मानव व वन्यजीव संघर्ष वाढणार हि भिती अनेक पर्यावरणवाद्यांतर्फे अनेक वर्षांपासून व्यक्त करण्यात येत होती ती खरी ठरीत सन ०४/०१/२०१४ पासुन आजपर्यंत जिल्ह्यात वाघाच्या हल्यात ९१, बिबटच्या हल्यात २१, रानडुकरच्या हल्यात १८, अस्वलांच्या हल्यात ०५ तर इतर हिस्त्र प्राण्यांच्या हल्यात ०६ अश्या जवळपास १४१ नागरीकांच्या वर जिव गेला असुन तब्बल २८७ पेक्षा जास्त नागरीक या वन्यप्राण्यांच्या हल्यात किळकोळ / गंभीर जखमी झाले आहे.

मागील काही वर्षात तर मा. मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर यांच्या कार्यालयापासुन अवघ्या ३-४ कि. मी. च्या अंतरावरील परीघात आजपर्यंत २० नागरीकांहून अधिकांचा बळी गेलेला आहे. सन २०१९ पासून म्हणजेच मागच्या ३ वर्षाच्या काळात अधिकृत आकडेवारी नुसार चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, उर्जानगर, डब्ल्यु.सी.एल. कॉलनी, दुर्गापूर व लगतच्या नेरी-कोंढी परीसरातील राजेश नागेश्वर गुजलवार वय २६ वर्षे यांना दिनांक ०९/०१/२०१९ सिनाळा येथे वाघाने ठार केले, दिनांक ०३/१०/२०१९ ला महेश रामा ठाकरे वय ६५ वर्ष यांना सिनाळा येथे शेतशिवारात वाघाने ठार केले. दिनांक ३०/०४/२०२० ला लता पांडूरग सुरपाम वय ५५ वर्ष यांना आगरझरी येथे वाघाने ठार केले. दिनांक २६/०८/२०२० ला उर्जानगर वसाहतीतून ५ वर्षाच्या लावन्या उमाशंकर धांडेकर या मुलीला आईच्या डोळयादेखत बिबटयाने उचलून नेत ठार केले, दिनांक १७/०१/२०२१ ला मनोज जनार्धन दुर्योधन वय ३५ वर्ष यांना डब्ल्यु.सी.एल. दुर्गापूर परीसरात वाघने ठार केले, दिनांक १६/०२/२०२१ ला नरेश वामण सोनवने वय ४० वर्ष यांना डब्ल्यु.सी.एल. पदमापूर परीसरात वाघने ठार केले, दिनांक २७/०९/२०२१ ला जोगेश्वर कारु रत्नपारखी वय ७० वर्षे यांना दुर्गापुर डब्ल्यूसीएल डंपिंगयार्ड परिसरात वाघाने ठार केले. दिनांक ०८/१०/२०२१ ला बबलू सिबील सिंग वय २८ वर्ष यांना डब्ल्यु.सी.एल. दुर्गापूर परीसरात वाघाने ठार केले, दिनांक ०२/११/२०२१ ला पितांबर गोदरु तोरे बय ६५ वर्ष यांना मोहर्ली जंगल परीसरात वाघाने ठार केले. दिनांक १२/११/२०२१ ला अनिल जोगेश्वर गुंजनकर वय ४५ वर्ष यांना डब्ल्यु.सी.एल. दुर्गापूर परीसरात वाघाने ठार केले, दिनांक १७/०२/२०२२ ला च.म.ओ.वि. केंद्रात वाघाने सायकलस्वार श्री. भोजराज मेश्राम यांच्यावर हल्ला करीत ठार केले. तसेच सलग दुसऱ्या दिवशी दिनांक १८/०२/२०२२ ला १६ वर्षीय श्री. राज उमेश भडके या युवकाला बिबटयाने डब्ल्यु. सी. एल. दुर्गापूर परीसरात हल्ला करीत ठार केले होते, प्रतीक बावणे या वय ८ वर्षे असलेल्या मुलाचा दिनांक ३०/०३/२०२२ ला नेरी या परिसरात असलेल्या घराच्या अंगणातुन बिबटने हल्ला करून जंगलसदृष्य परीसरात नेऊन दोन तुकडे केले होते, दुर्गापूर वार्ड क्रमांक ३ येथील श्रीमती लता मेश्राम नामक ४५ वय वर्षे असलेल्या महिलेचा दिनांक ०२/०५/२०२२ ला रात्री १२.०० च्या दरम्यान घराच्या अंगणात बिबट ने केलेल्या हल्यात मृत्यू झाला तसेच लगेच याच परिसराला लागून असलेल्या वॉर्ड क्रमांक १ मध्ये कु. अक्षया जगजीवन कोपुलवार या ३ वर्षाच्या मुलीवर दिनांक १०/०५/२०२२ ला बिबट्याने आईच्या डोळ्यादेखत हल्ला केला त्यावेळी मुलीच्या आईने आरडाओरड करीत मोठ्या शौर्याने काठीने त्या बिबट्याला मारल्याने बिबट्याने त्या मुलीला तेथेच सोडून पळ काढला, सुदैवाने हे लहान बाळ वाचले मात्र गंभीररीत्या जखमी झाली होती अश्याप्रमाने या क्षेत्रातील अल्पावधीतच १४ नागरीकांचा वर मागील ३ वर्षात बळी गेला, हे अतिशय संतापजनक आहे. तसेच या वन्यप्राण्यांच्या हल्यात याचं परिसरातील अनेक नागरीक गंभीररित्या जखमी झाले असुन भटाडी येथे वे को.ली. च्या कामगारावर अस्वलीने हमला करीत गंभीर जखमी केले होते, दिनांक ०२/१२/२१ ला पटटेदार वाघाने च.म.ओ.वि.के. च्या दुचाकीस्वार कामगारावर हल्ला केला होता परंतु त्यांच्या मागे असलेल्या इतर कर्मचारयांनी आरडाओरड केल्याने तो कर्मचारी किरकोळ जखमी होत थोडक्यात बचावला होता.

या सतत होणाऱ्या गंभीर घटनांवर नियंत्रण यावे याकरीता वनविभागाने उपाययोजणा कराव्या यासंदर्भात अनेकदा नितिन भटारकर यांनी निवेदने दिली होती. मात्र वनविभागाने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न केल्यानेच सदर गंभीर घटना घडल्या व निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असा आरोप भटारकर यांनी निवेदनात केला.

वनविभागाच्या ढिसाळ व नियोजनशुण्य कारभारामुळेच सतत निष्पाप नागरीकांचा जिव जात असल्याने शेवटी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर हे स्वतः दिनांक १६/०२/२०२२ ला वनविभागाच्या निषेधार्थ आमरण उपोषणाला बसले तेव्हा जिल्हा प्रशासन व वनविभागाच्या हालचालींना वेग येत च.म.ओ.वि.केंद्र प्रकल्पाच्या आवारात असलेल्या पट्टेदार १ मादी व २ नर अश्या एकुन ३ वाघांना जेरबंद करून इतरत्र अधिवासात हलविण्याची विशेष बाब म्हणून अनुमती / परवानगी देण्यात आली होती.

चंद्रपूर जिल्हयात मानव-वाघ संघर्षाबाबत अभ्यासासाठी महाराष्ट्र शासणाने स्थापण केलेल्या अभ्यासगटाने सुध्दा त्यांचे अहवालात क्षेत्राची वर्गवारी केलेली असुन शहरी भागातील मानवी वसाहतीजवळ अधिवास असलेल्या वाघ व इतर हिस्त्र वन्यप्राण्यांना हलविण्याबाबत शिफारस केलेली होती. सदर अभ्यास गटाच्या अहवालास मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षेतखाली दिनांक १२/१०/२०२१ रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १७ व्या बैठकीत मान्यता / स्विकृती देखील देण्यात आलेली आहे.

सदर पार्श्वभूमी तसेच या संबंधात पर्यावरण व वन मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्गदर्शक सुचना लक्षात घेता मा. सुनिलजी लिमये, मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांची खात्री झाली असल्याने यांच्यातर्फे शहरालगत उपरोक्त परिसरात झालेली मानवी हानी व मानवी जिवीतास असलेला संभाव्य धोका लक्षात घेता १ मादी व २ नर अश्या एकुण ३ पट्टेदार बाघांना जेरबंद करणे आवश्यक असल्याने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम १९(१) (क) अन्वये वाघांना जेरबंद करण्याच्या लेखी आदेश आमरण उपोषणाचा २ दिवसानंतर दिनांक १८/०२/२०२२ ला पारीत केला होता.

परंतु धुमाकुळ घालत असलेल्या व मानवी जिवीतास धोकादायक ठरलेल्या ३ वाघांना पिंजराबंद करण्यास तसेच गरजेप्रमाणे तंज्ञाचे उपस्थितीत व पर्यावरण व वन मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्गदर्शक सूचनेत नमुद केल्यानुसार बेशुध्द करून बंदीस्त करण्याची जी मंजुरी देण्यात आली आहे ती मंजुरी दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंतच वैध होती.

ज्या ३ वाघांना बेशुध्द करून जेरबंद करण्याची परवानगी देण्यात आली त्यापैकी एकाही वाघांना जेरबंद करण्यात वनविभागाला अजुनपर्यंत यश आलेले नसुन सुदैवाने वाघांच्या हल्ल्यात या मधल्या कालावधीत या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची जिवीतहानी झालेली नाही. परंतु बिबट्याने केलेल्या ३ हल्ल्यात तब्बल २ जीव घेतले व एकाला गंभीर जखमी केले होते. असाच संतापजनक प्रकार जिल्ह्यात इतर तालुक्यात सुद्धा सुरू असून दररोज वाघाच्या हल्यात जिवितहानी होत आहे.

जिल्ह्यात कुणाचे जीव गेल्यावर सर्वसामान्यांच्या आक्रोश, आंदोलन झाल्यानंतरच वनविभाग वाघ व बिबट यांना जेरबंद करणेसंदर्भात लेखी आदेश देतात. यावेळी देखील आंदोलन झाल्यानंतरच या परिसरातील नरभक्षक झालेल्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मा. मुख्य वनसरंक्षक चंद्रपूर यांनी यांचे कार्यालयीन पत्र क्रमांक. कक्ष-३ (४) /दक्षता /प्र. क्रं. ५/ २०२२-२३ / १७७ दिनांक १०/०५/२०२२ ला बिबटचे (मादी ) या अस्वाभाविक वर्तन, आक्रमक प्रवृत्ती व मानवी जिवितास निर्माण झालेला धोका लक्षात घेता दुर्गापूर परिसरात वावरत असलेल्या या बिबट (मादी) या वन्यप्राण्यास वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे कलम अन्वये पारित केले होते.

अश्या आदेशांच्या अनुषंगाने ३ महिन्याच्या काळात या परिसरातील १ वाघ व २ बिबट वन विभागाने जेरबंद केले. याचप्रमाणे जिवितहानी होण्याअगोदर याच तत्परतेने जिल्ह्यातील नरभक्षक झालेले वाघ व बिबट्यांना वन विभागाने जेरबंद करावे. व म्हणून मा. मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी वाघांना जेरबंद करण्याच्या दिलेल्या आदेशाचा तात्काळ कालावधी वाढवीने संदर्भात देखील संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश दयावे व जिल्ह्यातील इतर तालुक्यात धुमाकूळ घालत असलेल्या वाघांचा देखील बंदोबस्त करण्याबाबत उपाययोजना व्हावी यासंदर्भात आपण पाऊल उचलावे ही विनंती करण्यात आली.

मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १२/१०/२०२१ रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १७ व्या बैठकीत शासनाने स्थापण केलेल्या अभ्यासगटाने चंद्रपूर शहरी भागातील मानवी वसाहतीजवळ अधिवास असलेल्या वाघ, बिबट, अस्वल व इतर हिंस्त्र वन्यप्राण्यांना हलविण्याबाबत दिलेल्या अहवालास मान्यता /स्विकृती दिली असल्याने तात्काळ चंद्रपूर जिल्ह्यातील, शहराच्या लगत असलेल्या उर्जानगर व दुर्गापूर परिसरातील सर्व हिस्त्र प्राण्यांना जेरबंद करून इतरत्र हलविण्याची कार्यवाही करावी या करिता आवश्यक निर्देश संबधीतांना दयावे, तसेच या गंभीर विषयासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक आयोजीत करुन महत्वाच्या ज्या शासन स्तरावरील परवानग्या असेल त्या देण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात सन २०१४ पासून मृत झालेले व जखमी झालेल्यांना वनविभागातर्फे करण्यात येणार्या भरपाईच्या रक्कमेपोटी शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या शासननिर्णयानुसार ६ कोटी ४६ लाख ४५ हजार ९७ रुपयांचा निधी फेब्रुवारी २०२२ पर्यंत मंजुर करण्यात आला होता. परंतु वनविभागाकडे नुकसान भरपाई करिताचा निधी नसल्याने अनेकांना आजपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. व म्हणुन जिल्ह्यातील झालेली मनुष्यहानी, पशुहानी व शेतीपिकाचे नुकसान याकरिता तात्काळ २ कोटी रुपये वनविभागाला द्यावे जेणेकरून प्रलंबित असलेल्यांना तो निधी वाटप करता येईल ही महत्वाची देखील मागणी मा. उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली.

वरील सर्व गंभीर विषयावर वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल असे आश्वासन अजित दादा पवार यांनी नितीन भटारकर यांना यावेळी दिले.