भविष्यातील आरोग्याचा धोका टाळण्यासाठी लसीकरण करून घ्या - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
बुस्टर डोज केवळ 75 दिवस मोफत ; त्यानंतर मोजावे लागणार पैसे
जिल्हाधिका-यांची लसीकरण केंद्राला भेट
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 18 जुलै : केंद्र सरकारच्या सुचनेनुसार 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या 75 दिवसांच्या कालावधीत सर्व शासकीय लसीकरण केंद्रावर बुस्टर डोज मोफत मिळणार आहे. कोविड या आजाराचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेता, भविष्यात आरोग्याचा धोका टाळायचा असेल, तर लसीकरण हाच त्यावर एकमात्र उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी त्वरीत लसीकरण करून स्वत:ला सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले..
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टास्क फोर्सच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्लेलवार आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात पहिला डोज 96.43 टक्के, दुसरा डोज 82.93 टक्के तर बुस्टर डोज 35097 नागरिकांनी घेतला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, बुस्टर डोजसाठी 18 वर्षावरील नागरिकांनी कोविड लसीच्या दुस-या डोजनंतर 6 महिने किंवा 26 आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला असावा. ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ अंतर्गत 75 दिवस बुस्टर डोज मोफत मिळणार असून 30 सप्टेंबरनंतर नागरिकांना यासाठी स्वत:च्या खिशातून पैसे मोजावे लागतील. जिल्ह्यात सद्यस्थितीत लसींची चांगली उपलब्धता आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचा पहिला, दुसरा किंवा बुस्टर डोज राहिला असेल त्यांनी त्वरीत लसीकरण करून घ्यावे.
दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे लसीकरण होते की नाही, याबाबत आरोग्य विभागाने तालुका आणि ग्रामपातळीवर नियमित आढावा घ्यावा. सुक्ष्म नियोजन करून प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामस्तरावर याद्या तयार करा. प्रत्येक दिवशी किती लसीकरण झाले, कमी झाले असल्यास त्याची कारणे आदींबाबत संबंधितांना विचारणा करावी. आरोग्य विभागाने नोडल अधिका-यांची नियुक्ती करावी. ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ हे 75 दिवसांसाठी मोफत अभियान आहे. त्यामुळे रोजचे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा बॅकलॉग वाढत जाईल, याची जाणीव ठेवा. शाळा – महाविद्यालयांमध्ये 12 ते 14 आणि 15 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण सत्रांचे आयोजन करावे. अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
जिल्ह्यात 10 लक्ष 43 हजार 853 बुस्टर डोजचे नियोजन करण्यात आले आहे. यात 9 लक्ष 53 हजार 539 कोव्हीशिल्ड तर 90314 कोव्हॅक्सिन लसींचा समावेश असल्याचे डॉ. गहलोत यांनी सांगितले.
जिल्हाधिका-यांची लसीकरण केंद्राला भेट : शहरातील रामनगर परिसरात असलेल्या मनपाच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक - 2 ला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी भेट देऊन पाहणी केली. मनपाच्या सर्व केंद्रांमध्ये लसीकरणाचे एक-एक सत्र लावावे. तसेच लसीकरणाची जनजागृती करण्यासाठी शहरातून लाऊडस्पीकर फिरवावा, अशा सुचना त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी दिवसभरात झालेले लसीकरण, लस टोचल्यानंतर विश्रांतीकरीता उपलब्ध असलेल्या सुविधा, नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद आदींची माहिती घेतली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, मनपा आयुक्त राजेश मोहिते, डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. अश्विनी भारत, डॉ. नयना उत्तरवार, डॉ. शरयू गावंडे, ऐश्वर्या सोनटक्के आदी उपस्थित होते.
दिनचर्या न्युज