जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थांवर कारवाई करण्याचे दिले निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांकडून सुरक्षित अन्न आणि निरोगी आहार
सल्लागार समितीचा आढावा

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधित अन्नपदार्थांवर कारवाई करण्याचे दिले निर्देश


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर,दि. 20/1/2023 :
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हास्तरीय सल्लागार समितीची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व अन्न आस्थापनांना परवाना व नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रयत्न करावेत. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तातडीने करुन प्रमुख आस्थापनांची नियमितपणे तपासणी, प्रतिबंधित अन्नपदार्थांवर जास्तीत जास्त कारवाई करावी. तसेच अन्न व औषध प्रशासनामार्फत राबविण्यात येणारे उपक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागास दिले.
बैठकीला अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. टोपले, जिल्हा पुरवठा अधिकारी शालिकराम भराडी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सचिन राखुंडे, अन्नपदार्थ व्यावसायिक प्रतिनिधी प्रशांत चिटनूरवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासनाने 1 एप्रिल 2022 पासून एकूण 267 नमुने विश्लेषणास्तव घेतले. त्यापैकी 75 नमुने प्रमाणित, 3 नमुने कमी दर्जाचे तर 13 नमुने लेबलदोषाचे घोषित झाले आहे. तर पाच नमुने असुरक्षित घोषित असून 171 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहे. तसेच सदर कालावधीमध्ये 360 आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 69 आस्थापनांना सुधारणा नोटीस पाठविण्यात आल्या आहेत, 4 आस्थापनांचे परवाना निलंबित करण्यात आले, 39 आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी सांगितले.
तसेच 1 ऑगस्टपासून सणासुदीची मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने मिठाई, खाद्यतेल, वनस्पती तूप, नमकीन, रवा, बेसन व भगर आदी अन्नपदार्थांचे एकूण 72 नमुने घेण्यात असून 18 लक्ष 86 हजार 958 किंमतीचा एकूण 11,565 किलोग्रॅम अन्नपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. प्रतिबंधित अन्नपदार्थ जसे सुगंधित तंबाखू पान मसाला स्वीट सुपारी आदींचा एकूण 13 प्रकरणात 23 लक्ष 52 हजार 436 रुपये किमतीचा 1,243 किलोग्रॅम साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनामार्फत केलेल्या विविध कामकाजाचा आढावा घेतला.