शिवनी वनपरिक्षेत्रात दोन वाघाच्या झुंजीत बछड्याचा मृत्यू




दोन वाघाच्या झुंजीत बछड्याचा मृत्यू

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर विभागात अवयस्क वाघाच्या बछड्याचा मृत्यू

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर विभागातील शिवनी वनपरिक्षेत्रात एका अवयस्क वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला.
प्राथमिक तपासातून असे निदर्शनास येते की, सदर बछड्याचा मृत्यू दोन वाघांमधील झुंजीत झालेला आहे. सदर बछड्याचे मृतदेह कक्ष क्रमांक ८४२, नियतक्षेत्र शिवनी येथे आढळून आला.
घटनास्थळाच्या पाहणीवरून वाघाच्या मानेवर जखमा असल्याचे तसेच झुंज झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
सदर माहिती कळताच स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बफर विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक श्री. एस. एस. डुबे, एनटीसीए चे प्रतिनिधी श्री. बंडू धोत्रे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी श्री. मुकेश भांदककर, डॉ. विलास गावखरे (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, मुल) व डॉ. बजरंग सवारे (पशुधन विकास अधिकारी, सिंदेवाही) यांच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले व त्यानंतर एनटीसीए च्या मानक प्रक्रियेनुसार (SOP) सदर मृतदेहाचे दहन करण्यात आले.