वरोरा पंचायत समितीचे सहाय्यक लेखा अधिकारी कांबळे अँटी करप्शनच्या जाळ्यात





वरोरा पंचायत समितीचे सहाय्यक लेखा अधिकारी कांबळे अँटी करप्शनच्या जाळ्यात



आनंद गुरूदास कांबळे, सहाय्यक लेखा अधिकारी, पंचायत समिती वरोरा याला लाच घेतांना रंगेहात पकडले

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-५/१/२०२३
तक्रारदार हे मौजा वरोरा येथील रहीवासी असून तक्रारदार हे दिनांक ३१/०५/२०२२ रोजी पंचायत समिती वरोरा अंर्तगत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र येथून आरोग्य सहाय्यक या पदावरून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले आहेत. तरी तक्रारदार यांचे अर्जित रजेचे सममूल्य रक्कम ६.५६.६००/- रूपयेचे बिल काढून देण्याचे कामाकरीता आरोपी आनंद गुरूदास कांबळे, सहायक लेखा अधिकारी, पंचायत समिती वरोरा यांनी तक्रारदारास ४,०००/- रूपयेची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपी आनंद गुरुदास कांबळे, सहायक लेखा अधिकारी, पंचायत समिती वरोरा यांना लाच म्हणून ४०००/- रु. देण्याची त्यांची मुळीच इच्छा नसल्याने त्याचेविरुद लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय चंद्रपुर येथे तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीवरून दिनांक ०४/०१/२०२३ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी आनंद गुरूदास कांबळे, सहायक लेखा अधिकारी, यांनी ४०००/-रु. लाचेची मागणी करून तडजोडीअंती २.५००/- रूपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून आज दिनांक ०५/०१/२०२३ रोजी पंचायत समिती वरोरा येथे सापळा रचून आरोपी आनंद गुरूदास कांबळे, यांला २,५००/-रु. लाच रक्कम स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांनी आरोपीला रंगेहाथ पकडले व अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही ही राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर, श्री. मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक श्री. अविनाश भामरे, ला.प्र.वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात जितेंद्र गुरनुले, पोलीस निरीक्षक, तसेच कार्यालयीन स्टॉफ ना.पो.अ. संदेश वाघमारे, रोशन चांदकर पो. राकेश जांभुळकर, मपोकों पुष्पा काचोळे व चालक पो अं. सतीश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.

यापुढे जनतेला कोणीही लाचखोर अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

दिनचर्या न्युज