भूखंड वाटपाची प्रक्रिया राबविताना अगोदर स्थानिकांना प्राधान्य देणार : मंत्री उदयजी सामंत
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. २० डिसेंबर २०२३ : चंद्रपूर जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील खाली भूखंड परत घेणार असून, नवीन लोकांना भूखंड वाटपाची प्रक्रिया राबविताना अगोदर स्थानिकांना प्राधान्य देणार असे आश्वासन उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी दिली.
चंद्रपूर बाजार समितीचे माजी सभापती काँग्रेसचे नेते दिनेश दादापाटील चोखारे यांनी उद्योग मंत्री उदयजी सामंत यांना भेटून याबाबत निवेदन दिले. यावेळी पवन अगदारी उपस्थित होते.
चोखारे यांनी निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र अलिकडच्या काळात जिल्ह्याची ओळख पुसली जात आहे. जिल्ह्यातील उद्योग कमी होत आहेत. त्या तुलनेत बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चंद्रपूरसह वरोरा, भद्रावती, मूल, पोंभुर्णा, राजुरा, तालुक्यात उद्योगांना चालना देण्यासाठी एमआयडीसीची निर्मिती करण्यात आली आहे. एमआयडीसींचे सर्व जमिनी उद्योजकांनी अधिग्रहितही केल्या आहेत. मात्र कित्येक वर्षांपासून या जमिनीवर उद्योग उभे राहिलेले नाहीत. बहुतांश एमआयडीसी परिसर ओसपडल्याचे दिसून येत आहे.
चंद्रपूर शहर उद्योगांचे शहर आहे. कोळसा खाणी, वीज केंद्र, एमईएल, असे कारखाने शहराच्या सभोवताल आहेत. तरीही जिल्ह्याचे स्थान आणि वाढती बेरोजगारी टाळण्यासाठी शहरासाठी दाताळा मार्गावर एमआयडीसीची उभारणी करण्यात आली आहे. या एमआयडीसीतही काही उद्योग उभे झाले आहेत. मल्टीऑर्गनिक हा उद्योग सोडला तर डोळ्यात भरण्याएवढा मोठा उद्योग या परिसरामध्ये नाही. काही उद्योग एमआयडीसीत दिसत असले तरी अनेक जमिनी अद्यापही रिकाम्या आहेत.
उद्योगाच्या नावावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर स्वस्तात भूखंड मिळतात म्हणून केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील शेकडो लोकांनी विविध एमआयडीसीत भूखंड घेतले. आश्चर्याची गोष्ट अशी की या भूखंडधारकांचा उद्योग भूखंड बुक करण्यापलिकडे पुढे सरकलाच नाही. आज जर कोणीही अशा एमआयडीसीचा फेरफटका मारला तर उजाड माळरानापलिकडे या एमआयडीसीत काहीच दिसून येत नाही.
शासनाला विविध शहरातील एमआयडीसीची खरोखरच प्रगती बघायची असेल तर ज्यांनी ज्यांनी येथील भूखंड बुक केले आहेत, त्यांच्याकडून अगोदर हे भूखंड परत घेण्याची प्रक्रिया सुरू करावी. भूखंड परत घेतल्यानंतर नवीन लोकांना भूखंड वाटपाची प्रक्रिया राबविताना अगोदर स्थानिकांना प्राधान्यक्रम द्यावा अशी विनंती चोखारे यांनी केली.
या विनंतीवर बोलताना उद्योग मंत्री उदयजी सामंत म्हणाले की, योग्य ती चौकशी करून स्थानिकांना प्राधान्य देऊ असे आश्वासन दिले. यावेळी सविस्तर चर्चा झाली.