प्रियकरच निघाला 'त्या' अर्धनग्न अवस्थेत सापडलेल्या युवतीचा मारेकरी
स्थानिक गुन्हे शाखेने केले आरोपीस जेरबंद
दिनचर्या न्युज :-
गडचिरोली: –(प्रतिनिधी)
गडचिरोली तालुक्यातील पोर्ला जवळील जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 18 किमी अंतरावरील पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या मौजा पोर्ला वडधा मार्गावरील जंगल परिसरात एका अनोळखी मुलीचे अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. मृतक मुलीची ओळख पटली नसल्याने तिची ओळख पटवून खुन्याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन गडचिरोली पोलीस दलासमोर होते. प्रकरणाची तिव्रता लक्षात घेवून तात्काळ मा. अपर पोलीस अधिक्षक,. कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट देवून पाहाणी केली. श्वान पथक तसेच अंगुलीमुद्रा विभागातील अधिकारी यांना घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. परंतु, मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलीस अधीक्षक . नीलोत्पल यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाकरीता चार तपास पथक तयार करून स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली यांना मृतदेहाची ओळख पटवून गुन्हा उघडकिस आणण्याची विशेष जबाबदारी सोपविली.
सीमावरतील भागातील सर्व जिल्ह्यांना या संदर्भाची माहिती दिल्या गेली. गुप्त माहितीच्या आधारे युवती चंद्रपूरातुन एक मुलगी वय अंदाजे १९ वर्ष, रा. चंद्रपूर दिनांक २०/१२/२०२३ रोजी पासून चंद्रपूर येथून बेपत्ता आहे. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी पोलीस स्टेशन, रामनगर, जिल्हा चंद्रपूर येथून माहिती घेतली असता सदर मुली संदर्भात मिसींग क्रमांक १७८/२०२३ अन्वये नोंद आहे. त्यावरून तात्काळ मुलीचे नातेवाईकांना विश्वासात घेवून मृतदेहाचे फोटो दाखविले असता मृतक मुलगी ही त्यांचीच मुलगी असल्याची नातेवाईकांकडून खात्री पटली. संबंधीत मिसींग कोठे व कशी झाली तसेच ती शेवटी कोणा सोबत होती .याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पथकाने माहिती घेतली असता सदर मुलीचे निखिल मोहुर्ले, रा. वैरागड याचेशी प्रेमसबंध असून तिला भेटण्याकरीता निखील मोहले मूल येथे गेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने वैरागड येथून निखील मोहुले यांस ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, त्यास अधिक विश्वासात घेवून पोलीस खात्यात दाखवताच त्याने प्रकरणाबाबत माहिती दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपी नामे निखील मोहुर्ले यांस पुढिल तपास करिता गडचिरोली पोलीसांच्या ताब्यात
दिले.सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल व अपर पोलीस अधीक्षक . कुमार चिता यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड, पोउपनि निलेशकुमार वाघ, श्रिकांत बोईना, प्रशांत गरफडे, क्रिष्णा परचाके, दिपक लोणारे, माणिक निसार, माणिक दुद्यबळे, सतिष कत्तीयार, मनोहर तोगरवार तसेच पोलीस स्टेशन गडचिरोली येथील पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, मपोउपनि विशाखा म्हेत्रे, भाऊराव बोरकर व इतर अंमलदार यांनी केली आहे.