एकाच कुटुंबातील पाच जणांचा समृद्धी महामार्गावर अपघात, दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा !




एकाच कुटुंबातील पाच जणांचा समृद्धी महामार्गावर अपघात, दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील डी. एड. कॉलेजजवळ राहणारे जीवने कुटुंबीयावर अत्यंत दुर्दैवी घटना घडली.
मन सुन्न करणारी घटना, रविवारी दुपारी १२ वाजता धामणगाव रेल्वे नजीक घडला.
चंद्रपूरातील आरती जगताप (जीवने) या एकात्मिक बाल विकास कार्यालय चंद्रपूर येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नुकत्याच त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या.
आज दिनांक २८ रोजी सकाळी अंदाजे ९.३० च्या सुमारास त्या चंद्रपूर वरून कुटुंबासमवेत अकोल्याकडे निघाल्या होत्या.
मात्र नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग त्यांच्यासाठी अखेरची घटका ठरली. चालकाचे यांचे नियंत्रण गेल्याने त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला धडक दिली. धडक इतकी भयानक होती की कारच्या आतील पाचही जणांना जागीच मृत्यू झाला.
या अपघातात आरती जीवने (४०), भास्कर जीवने (45), महादेव जीवने (65), लता जीवने (60) आणि त्रिशा जीवने (१२) सर्व रा. डी.एड. कॉलेजजवळ, बाबुपेठ, चंद्रपूर यांचासमावेश आहे.
धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक १०६ परिसरात त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव वेगात जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
प्राथमिक तपासात भरधाव वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून कार उभ्या कंटेनरवर आदळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मात्र, अपघाताचे नेमके कारण, कंटेनरची उभी करण्याची परिस्थिती, रस्त्यावरील सुरक्षिततेचे नियम पाळण्यात आले होते का, तसेच इतर तांत्रिक बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दुर्घटनेची माहिती चंद्रपूरमध्ये पोहोचताच बाबुपेठ परिसरात शोककळा पसरली. एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.