.. हा आमचा अधिकार मुंबई- पुणेला नियमित गाडी करा,
जाहीर सत्कार करू - पप्पू देशमुख
माननीय पालकमंत्र्यांना आव्हान..
"वंदे भारत'चा ढोल बडवण्या ऐवजी मुंबई-पुणेला ट्रेन सुरू करा
दिनचर्या न्यूज :-
चंद्रपूर:-
देशाच्या 28 पैकी 16 राज्यातून या भागात कामानिमित्त आलेले किंवा स्थायिक झालेले नागरिक त्यांच्या राज्याच्या राजधानीमध्ये थेट जाऊ शकतात.त्यासाठी नियमीत रेल्वे गाड्या आहेत. परंतु आमच्याच राज्याच्या राजधानीत मुंबईला जायला बल्लारपूर-चंद्रपूर वरून नियमित गाडी नाही. महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून सुध्दा मुंबई व पुणेला जाण्यासाठी रेल्वेच्या अनेक नियमित गाड्या आहेत. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांसाठी मुंबई किंवा पुणे ला जायला मात्र थेट व नियमित गाडी नाही. आम्ही रेल्वेला कोळसा,सिमेंट व लोहखनिजाच्या वाहतूकीतून दरवर्षी हजारो कोटींचे उत्पन्न देतो. त्यामुळे आमच्या गरजेप्रमाणे मुंबई- पुण्यासाठी नियमित व थेट गाडी मिळणे ही जिल्ह्यातील नागरिकांची मागणी नसून त्यांचा अधिकार आहे.
मुंबई किंवा पुण्याला राहणाऱ्या चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील हजारो युवकांना स्वगावी येण्यासाठी,त्यांच्या वयस्कर आई-वडिलांना तात्काळ गरज पडल्यास मुलांकडे जाण्यासाठी, आपल्या अधिकारासाठी मंत्रालयात चकरा मारणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी, एवढेच नव्हे तर कर्करोग किंवा हृदयविकारासारख्या दुर्धर आजारावर उपचार घेण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांसाठी नियमीत व थेट गाडी नाही.कशीबशी सुरू असलेली लिंक एक्सप्रेस बंद करण्यात आली.ती सुद्धा पूर्ववत सुरू करण्यात लोकप्रतिनिधींना अजून पर्यंत यश आले नाही. अनेक वर्षांपासून आमदारकी, खासदारकी किंवा मंत्रिपद भोगणाऱ्या लोकप्रतिनिधींचे हे यश आहे की अपयश आहे ? गरज व मागणी नसलेली नागपूर सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्याचा ढोल बडवण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी थेट मुंबई- पुण्याकरिता नियमित गाडी सुरू करून दाखवावी.हे जनविकास सेनेचे पालकमंत्र्यांना आव्हान आहे. पालकमंत्र्यांनी नियमित गाडी सुरू केल्यास त्यांचा जाहीर सत्कार करू. असे आवाहन आज पत्रकार परिषदेतून पप्पू देशमुख, घनश्याम येरगुडे, इंद्राल शेख, आकाश लोंढे, सुभाष पाच भाई, मनीषा बोकडे, प्रफुल ब्रह्मरम, देवराव हटवार, घोडमारे यांनी केली.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मालवाहतुकीतून 5000 कोटी रूपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले
चंद्रपूर जिल्ह्यातून होणाऱ्या कोळसा, सिमेंट व लोहखनिजाच्या वाहतुकीचा उत्पन्नात मोठा वाटा
प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत रेल्वेला मालवाहतुकीतून अधिक उत्पन्न मिळते. यामध्ये 60 % च्या वर कोळसा तसेच सिमेंट व लोहखनिजाच्या वाहतूकीचा समावेश असतो. चंद्रपूर जिल्ह्यातून कोळसा, सिमेंट व लोहखनिज या तीनही खनिजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यानेच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला या वर्षी वेळेपूर्वीच मालवाहतुकीतून 5000 कोटी रूपयांचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले. आमचा जिल्हा रेल्वेला हजारो कोटी रूपयांचे उत्पन्न मिळवून देतो. त्यामुळे आमच्या गरजेप्रमाणे बल्लारपूर वरून थेट मुंबई-पुणेला जाण्या करिता नियमित गाडी सुरू करणे रेल्वेचे कर्तव्य आहे.ही आमची मागणी नसून हा आमचा अधिकार आहे. हा अधिकार मिळवण्यासाठी 30 सप्टेंबर पासून जनविकास सेनेतर्फे जन आंदोलन सुरू करण्यात येत आहे. 30 सप्टेंबर रोजी बल्लारपूर रेल्वे स्थानका समोर धिक्कार आंदोलन करून जनआंदोलनाची सुरुवात होईल. असे आव्हाने पत्रकार परिषदेतून केले.