महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण साहित्य संमेलनात सहा ठराव मंजूर
नाभिक साहित्य मंडळ महाविद्यालये, शाळांमध्ये राबवणार साहित्य उपक्रम
दिनचर्या न्युज :-
प्रतिनिधी। जळगाव
महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे तृतीय साहित्य संमेलन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या लेखणीने गंधित झालेल्या जळगाव शहरात शनिवारी येथील शिरोमोली रस्त्यावर असलेल्या श्री साईलीला सभागृहात पार पडले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संमेलनाची सुरुवात करण्यात आली.
साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष भगवानराव चित्ते यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे तृतीय साहित्य
संमेलनात ६ ठराव समारोपीय सत्रात सहा ठराव मंजूर करण्यात आले. त्यात मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्रदान करण्यात आल्याने सरकारच्या अभिनंदन करण्याचा ठराव, नाभिक समाजातील साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य सरकारने समाजातील साहित्यिकांना साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याचा ठराव मंजूर झाला. शासनाने साहित्य कलादर्पण संघाद्वारे आयोजित साहित्य संमेलनासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर झाला. पुढील वर्षीपासून 'नाभिक जीवन गौरव' आणि 'नाभिक साहित्य सेवा' पुरस्कार तसेच महिला आणि युवा साहित्य गौरव पुरस्कार देण्याचा ठराव मांडण्यात आला. समाजातील युवक, युवती, विद्यार्थ्यांना लेखनाचे प्रोत्साहन मिळावे यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये साहित्य विषयक उपक्रम राबविण्याचा ठराव मांडण्यात आला. महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाची धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्याचा ठराव करण्यात आला.
संमेलनाच्या व्यासपीठावर ग्रामीण विकास व पंचायत राज युनिव्हर्सिटी गदग कर्नाटकाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ.
विष्णुकांत चटपल्ली, संमेलनाचे अध्यक्ष लेखक भगवान चित्ते, पहिले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गोपाल कृष्ण मांडवकर, दुसऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरद ढोबळे, मुख्य मार्गदर्शक सयाजी झुंजार, मुकुंद धजेकर, रवींद्र( बंटी) नेर पगारे, सुनिता वरणकर, .किरण भांगे, जळगाव येथील हभप मनोहर खोंडे, डॉ. व्यंकटराव काळे
यांची उपस्थिती होती.
साहित्याला शिक्षणाची जोड दिल्यास होतील उत्तम रचनाकारः डॉ. चटपल्ली
स्पर्धात्मक युगात शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणामुळे शिस्त, चारित्र्य निर्माण होते. समाजात महत्व मिळते. शैक्षणिक क्षेत्रात नाभिक समाजबांधवांनी गेले पाहिजे. साहित्याला शिक्षणाची आवश्यकता आहे. त्यामुळे साहित्य रचना उत्तम येते. तेव्हा नाभिक समाजातून उत्तम साहित्यिक घडतील, असे प्रतिपादन ग्रामीण विकास व पंचायत राज युनिव्हर्सिटी, गदग, कर्नाटकचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. विष्णुकांत चटपल्ली यांनी केले.
कोल्हापूर येथील सलून उद्योजक सयाजी झुंजार यांनी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली चळवळ, या संदर्भात आपले प्रखळ मत मांडले.
प्रथम सत्रात मांडणी
संमेलनातील प्रथम सत्रात 'सकल नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी उद्याच्या सामाजिक व राजकीय दिशा' या विषयावर वक्त्यांनी मांडणी केली. यात अध्यक्षस्थानी गोपालकृष्ण मांडवकर होते. तर सोलापूर येथील किरण भांगे, जळगाव येथील हभप मनोहर खोंडे, डॉ. व्यंकटराव काळे यांनी विचार मांडले.
महिला परिसंवाद
दुसरा परिसंवाद महिलांसाठी असून 'नाभिक समाजातील महिलांचे सबलीकरण' या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा वाघमारे होत्या. यात निवृत्त शिक्षिका माया नंदुरकर, धुळे येथील डॉ. हर्षदा निंबा बोरसे, अलका सोनवणे यांचा सहभाग होता.
16 कवींचे रंगतदार कवी संमेलन
कवी संमेलनात शेवटी 16 कवींनी आपल्या सहभाग घेतला होता. समाजातील गंभीर विषयावर कवींनी शब्दरूपी मांडणी केली. त्यात खास करून मध्य प्रदेश जबलपूरहून आलेले हिंदी भाषिक कवी माथुरकर यांनी आपल्या ओजस्ववाणीतून कविता सादर करून सर्वांचे मन जिंकली.
प्रस्तावनेतून मुकुंद धंजेकर यांनी संमेलन घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. शेवटच्या सत्रात कवी संमेलन घेण्यात आले. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन मुंबई येथील प्रवीण बोपुलकर आणि अश्विनी अतकरे यांनी केले. यात दूरवरून आलेल्या कवींनी सहभाग घेतला.
संमेलन यशस्वीतेसाठी संजय सोनवणी राजकुमारी संजय पवार, उदय पवार, चंद्रकांत शिंदे, उमाकांत निकम, सुनील बोरसे, सुधाकर सनन्से, अनिल शिंदे आदींनी परिश्रम घेतले.