दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे मुख्यअभियंता विवेक पेंढे यांचा एक धक्कादायक व्हिडिओ चंद्रपूर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी समाज माध्यमावर मीडियावर सार्वत्रिक केला आहे. या व्हिडिओत अभियंता पेंढे कंत्राटदाराकडून २० हजार रुपयाचे पॉकेट घेत असल्याचा आरोप आपने केला आहे. सध्या या व्हिडिओने समाज माध्यमात धुमाकूळ घातला असून हा व्हिडिओ नेमका काढला कुणी याचा शोध जिल्हा परिषद कंत्राटदार असोसिएशनचे पदाधिकारी घेत आहे. कारण त्यावेळेस अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जे कंत्राटदार होते त्यापैकीच कोणीतरी एकाने काढला असा कयास लावला जात आहे.
या व्हिडिओमध्ये पेंढे हे स्वतःच्या कार्यालयातील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये २० हजार रुपये स्वीकारताना स्पष्टपणे दिसत आहेत असेही आपने येथे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. एवढेच नाही, तर पैसे स्वीकारल्यानंतर ते समोरील व्यक्तीला विचारतात किती आहे. यावर समोरील व्यक्ती सांगतो २० आहे. यानंतर पेंढे उर्वरित पैशांची मागणी करतात त्यावर समोरील व्यक्ती लवकरच उर्वरित पैसे आणतो असे आश्वासन देताना ऐकू येतो. ही घटना केवळ लाच स्वीकारण्यापुरती मर्यादित नाही तर उर्वरित लाचेची मागणी झाल्याचे ठोस पुरावे यातून समोर आले आहेत.
महत्वाचे म्हणजे, विवेक पेंढे यांना काही महिन्यांपूर्वीच भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे निलंबित करण्यात आले होते. परंतु स्थानिक सत्ताधारी आमदाराच्या राजकीय आशीर्वादामुळे ते पुन्हा सेवेत रुजू झाले असाही आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांची 3-9- 2025 ला माध्यमानंतर पदमुक्त करण्यात आले होते. त्यांच्या जागी जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अधिकारी अभियंता पद्मोचक म्हणून प्रदीप बाराहाते यांची वर्णी लागली होती. काही दिवस त्यांना पदमुक्त ठेवले असताना सुद्धा पुन्हा त्याच ठिकाणी पदभार देण्यात आल्याची सूत्राची माहिती आहे.
या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फोन करून विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
यामुळे नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की भ्रष्टाचार करणाऱ्यांना राजकीय संरक्षण असल्यामुळे त्यांचे मनोबल अधिक वाढत आहे का? जिल्हा परिषदेच्या कामकाजातील पारदर्शकता आणि प्रामाणिकतेवर जनतेचा विश्वास राहणार कसा? आम आदमी पार्टी, चंद्रपूर जिल्हा या प्रकरणाचा तीव्र निषेध करते.

