माझं गाव, आरोग्य संपन्न गाव चळवळ लोकहिताची- डॉ. आशा साळवे
दिनचर्या न्युज :-
बल्लारपूर : प्रतिनिधी
नागरिकांच्या दैनंदिन जीवनात आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष चिंतेचा विषय ठरत असून, यामुळे आयुर्मानावरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येकाने आपल्या आरोग्याची जबाबदारी ओळखून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे, असे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा साळवे यांनी व्यक्त केले.
राज्य शासनाने १८ फेब्रुवारी २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रात “माझा गाव, आरोग्य संपन्न गाव” हे अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावागावात आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करून प्रत्येक ग्रामपंचायतीने आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबवावेत, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
या अंतर्गत प्रत्येक गावात ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून अभियान यशस्वी करण्यावर भर दिला जात आहे. १ एप्रिल रोजी ग्रामसभांच्या माध्यमातून अभियानाचा प्रचार-प्रसार करण्यात आला, तर २ एप्रिलला विभागस्तरीय कार्यशाळा घेऊन जनजागृतीसाठी दिशा ठरविण्यात आली.पंचायत समिती शिक्षण विभाग बल्लारपूरच्या वतीने १५ एप्रिल रोजी सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी व शिक्षकांच्या माध्यमातून रॅलीद्वारे जनजागृती मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर १६ एप्रिल रोजी राजे खाडक्या बल्लाळशा नाट्यगृह बल्लारपूर,आरोग्य विभागामार्फत आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच पंचायत समितीतील विविध विभाग प्रमुख, सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांची संयुक्त कार्यशाळा उत्साहात पार पडली.
कार्यशाळेची सुरुवात राज्यगीत व ‘वंदे मातरम’ने झाली. प्रास्ताविक करताना डॉ. आशा साळवे यांनी संपूर्ण तालुका निरोगी व सुदृढ करण्याची संकल्पना मांडली, ज्यास उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे यांनीही या अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले व बल्लारपूर तालुका जिल्ह्यात आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व पंचायत समिती बल्लारपूर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. “माझा गाव, आरोग्य संपन्न गाव” हे अभियान गावागावात आरोग्याची नवी जागृती निर्माण करून निरोगी समाज घडविण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
