विजेत्‍यांना 25 लाख रू. किंमतीची पारितोषीके 



सीएम चषक स्‍पर्धेला तरूणाईचा लाभलेला उदंड प्रतिसाद उल्‍लेखनिय – सुधीर मुनगंटीवार

बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत विविध स्‍पर्धांचा पारितोषीक वितरण सोहळा

 चंद्रपूर/प्रतिनिधी
युवकांमधील कला, क्रिडा या सुप्‍त गुणांना चालना मिळावी तसेच यासाठी त्‍यांना मोठे व्‍यासपिठ उपलब्‍ध व्‍हावे या उदात्‍त हेतुने आयोजित सीएम चषक स्‍पर्धेला बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील तरूणाईने दिलेला उदंड प्रतिसाद अतिशय उल्‍लेखनिय आहे. बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्र या स्‍पर्धेच्‍या नोंदणीमध्‍ये राज्‍यात अव्‍वल ठरले ही या विभागाचा लोकप्रतिनिधी म्‍हणून माझ्रयासाठी अभिमानाची बाब आहे. हे पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांच्‍या परिश्रमाचे फलीत असल्‍याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक 24 डिसेंबर रोजी बल्‍लारपूर शहरातील एकदंत लॉन येथे झालेल्‍या सीएम चषक स्‍पर्धे अंतर्गत विविध स्‍पर्धांच्‍या पारितोषीक वितरण समारंभात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी महाराष्‍ट्र वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपा नेते प्रमोद कडू, चंद्रपूर जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, विधान परिषद सदस्‍य आ. रामदासजी आंबटकर, बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, चंद्रपूरच्‍या महापौर सौ. अंजली घोटेकर, जिल्‍हा परिषदेचे समाजकल्‍याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, बल्‍लारपूर भाजपाचे अध्‍यक्ष काशीसिंह, शिवचंद द्विवेदी, निलेश खरबडे, सौ. रेणुका दुधे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी सीएम चषक स्‍पर्धेत बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत चंद्रपूर, बल्‍लारपूर, पोंभुर्णा आणि मुल तालुका स्‍तरावर घेण्‍यात आलेल्‍या विविध क्रिडा स्‍पर्धांमध्‍ये विजेत्‍या ठरलेल्‍या स्‍पर्धकांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पारितोषीके प्रदान करण्‍यात आली. पारितोषीक वितरण समारंभापूर्वी बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्र स्‍तरीय रांगोळी स्‍पर्धा, चित्रकला स्‍पर्धा, गीत गायन स्‍पर्धा आणि नृत्‍य स्‍पर्धा संपन्‍न झाली.  या स्‍पर्धांचे परिक्षण डॉ. जयश्री कापसे–गावंडे, श्रीमती मनीषा बोनगीरवार–पडगीलवार, सुशिल सहारे यांनी केले. सर्वच स्‍पर्धेतील विजेत्‍यांना 25 लाख रू. किंमतीची पारितोषीके प्रदान करण्‍यात आली.

रांगोळी स्‍पर्धेत सुहास दुधलकर, चंद्रपूर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषीक प्रदान करण्‍यात आले. गीत गायन स्‍पर्धेत ऊर्जानगरची समृध्‍दी इंगळे हिला प्रथम, प्रशांत शामकुंवर यांना द्वितीय, कुमुद रायपुरे यांना तृतीय तर विक्‍की दुपारे व नम्रता श्रीरामे यांना प्रोत्‍साहनपर पारितोषीके देण्‍यात आली. समुह नृत्‍य स्‍पर्धेत आरडी ग्रुप बल्‍लारपूर यांना प्रथम, नवरंग डान्‍स ग्रुप बल्‍लारपूर यांना द्वितीय, धारवी ग्रुप पोंभुर्णा यांना तृतीय तर जयभावनी ग्रुप व सातारा भोसले ग्रुप यांना प्रोत्‍साहनपर पारितोषीके देण्‍यात आली. एकल नृत्‍य स्‍पर्धेत प्रियंका कोरे प्रथम, प्रेरणा सोनारकर द्वितीय व आणि शितल कुमरे यांना तृतीय पारितोषीके देण्‍यात आली. चित्रकला स्‍पर्धेत अ गटात वंशिता मुलचंदानी प्रथम, प्रियांशु पांडे द्वितीय, खुशी उमरे तृतीय अशी पारितोषीके देण्‍यात आली. चित्रकला स्‍पर्धेत ब गटात सुदर्शन बारापात्रे चंद्रपूर प्रथम, गरीमा गुप्‍ता बल्‍लारपूर द्वितीय, शुभम येवतकर मुल तृतीय अशी पारितोषीके देण्‍यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रज्‍वलंत कडू यांनी केले तर स्‍पर्धा संयोजनाची जबाबदारी अॅड. रणंजयसिंह आणि सुरज पेदुलवार यांच्‍यासह अन्‍य सहका-यांनी पार पाडली.
कार्यक्रमाला बल्‍लारपूरकर नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.