भारतीय शिक्षण संस्‍थेने विद्यार्थ्‍यांना जिवनमुल्‍ये शिकविली- सुधीर मुनगंटीवार

श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी समारंभानिमित्‍त
स्‍व.धनंजय नाकाडे कलादालन व पसायदान सभागृहाचे लोकार्पण


चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर -कोणत्‍याही देशाच्‍या प्रगतीचे मुल्‍यमापन हे तो देश किती धनसंपन्‍न आहे यावर होत नसुन तो किती ज्ञानसंपन्‍न आहे यावर होत असते. कै. बालाजी पाटील बोरकर यांनी नवरगाव परिसरात विद्यादानाचे ईश्‍वरीय कार्य सुरू केले. भारतीय शिक्षण संस्‍था ही कष्‍टातुन उभी झालेली संस्‍था आहे. आज असंख्‍य संस्‍था आहे. मात्र अनेक संस्‍था केवळ व्‍यवहारशास्‍त्र शिकवत असल्‍याचे आपण बघतो. भारतीय शिक्षण संस्‍थेने मात्र जीवनशास्‍त्र शिकविण्‍याचे मोठे कार्य केले आहे. या संस्‍थेच्‍या शतकोत्‍तर वाटचालीसाठी मी शुभेच्‍छा देतो असे प्रतिपादन अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दि.29 डिसेंबर 2018 रोजी चंद्रपूर जिल्‍हयातील नवरगाव येथे ज्ञानेश महाविद्यालयाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी समारंभात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कल्‍याणकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, श्री. परमानंद पाटील बोरकर, भारतीय शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष जयंत बोरकर, सचिव सदानंद बोरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश बाकरे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, कला या दोन अक्षरांच्‍या शब्‍द समुहात मनाचे पोषण करण्‍याचा भाव दडला आहे. आज आपला समृध्‍द सांस्‍कृतीक वारसा जतन करीत आहोत. बल्‍लारपुर, मुल येथे नाट्यगृह आपण बांधले आहे. ब्रम्‍हपुरी येथे नाट्यगृहाचे बांधकाम मंजुर करण्‍यात आले आहे. कला व संस्‍कृतीची जपणुक करण्‍यासाठी आपण प्रयत्‍न‍शील आहोत. मिशन शौर्यच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हातील आदिवासी विद्यार्थ्‍यांनी माऊंट एव्‍हरेस्‍ट हे शिखर सर केले. आता मिशन सेवा या उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हयातील प्रत्‍येक तालुका स्‍तरावर स्‍पर्धा परिक्षांच्‍या तयारीसाठी अभ्‍यासिका आपण बांधणार आहोत. या ठिकाणी बसस्‍थानकाची मागणी करण्‍यात आली. जिल्‍हयात 11 नवीन बसस्‍थानके आपण बांधत आहोत. चंद्रपूर, भद्रावती, चिमुर, बल्‍लारपुर,मुल, घुग्‍घूस या ठीकाणी बसस्‍थानकांची बांधकामे सुरू झाली आहेत. आपण जागा उपलब्‍ध करा निश्चितपणे या मागणीचा विचार करू असेही यावेळी बोलतांना म्‍हणाले.

यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्‍या हस्‍ते स्‍व. धनंजय नाकाडे, स्‍मृती कलादालनाचे उद्घाटन करण्‍यात आले. तसेच पसायदान सभागृहाचे लोकार्पण करण्‍यात आले. या महाविद्यालयाची समृध्‍द परंपरा व यशस्‍वी वाटचाल प्रत्‍येक महाविद्यालयासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्‍याचे कुलगुरू डॉ. कल्‍याणकर म्‍हणाले. सभारंभाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ. सुरेश बाकरे यांनी केले. संस्‍थेचा प्रवास विशद करणारे मनोगत सचिव सदानंद बोरकर यांनी व्‍यक्‍त केले.

श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्‍या उभारणीत योगदान देणा-यांच्‍या वारसांचा सन्‍मान सुवर्ण महोत्‍सवी समारंभात करण्‍यात आला. काही माजी प्राचार्य व कर्मचारी यांना सेवा योगदान सन्‍मान देवुन गौरव करण्‍यात आला. 50 वर्षाच्‍या उभारणी पर्वातील आठवणिंना उजाळा देणारी ज्ञानार्थ ही स्‍मरणीका यावेळी विमोचीत करण्‍यात आली. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचारी वृंद, विद्यार्थी , विद्यार्थींनी, पालक व नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.