गपुरातील रेशीमबाग मैदानावर “शिवपुत्र संभाजी” महानाट्याला प्रारंभ


छत्रपती संभाजी महाराज यांचे महापराक्रमी जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी : - मुख्यमंत्री
नागपूर दि. 22 : शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज हे केवळ लढवय्येच नव्हते तर प्रचंड विद्वान होते. त्यांच्या महापराक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण केले. त्यांचे संघर्षपूर्ण जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने रेशीमबाग मैदान येथे “शिवपुत्र संभाजी” या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार मोहन मते, माजी महापौर प्रवीण दटके, शाहीर महेंद्र महाडिक, सुनील देशपांडे व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी माल्यार्पण केले व तुळजाभवानीची आरती केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अश्वपूजन व गजपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडकिल्ले प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे महापराक्रमी होते. त्यांनी जुलमी सत्तेविरुद्ध चिवट झुंज दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे त्यांनी प्राणपणाने रक्षण केले. त्रिभुवनात सुवर्ण अक्षरात लिहून ठेवता येईल, असा पराक्रम त्यांनी अनेक लढायांमधून गाजवला. ते कधीही पराजित झाले नाहीत. छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांचे संपूर्ण जीवन देशासाठी, स्वराज्यासाठी अर्पण केले. स्वराज्यासाठी त्यांचे सारे जीवन संघर्षपूर्ण राहिले. छत्रपती संभाजी महाराज यांचे सारे जीवनच पराक्रमाने ओतप्रोत भरलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे केवळ लढवय्ये नव्हते तर विद्वान होते. त्यांचे संस्कृत तसेच अनेक भाषांवर प्रभुत्त्व होते. अनेक क्षेत्रात ते निष्णात होते. छत्रपती संभाजी महाराज यांचे जाज्ज्वल्य देशभक्तीने प्रेरीत असलेले सारे जीवन आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील “शिवपुत्र संभाजी” हे महानाट्य सर्वासाठी प्रेरणादायी असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.