कोराडी व चंद्रपूर वीज केंद्र ग्रीन पेटल-२०१८ पुरस्काराने सन्मानित

नागपूर/प्रतिनिधी:
महानिर्मितीच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला जलसंवर्धन व पर्यावरणीय पुढाकारासाठी तर कोराडी औष्णिक विद्युत केंद्राला पर्यावरणीय पुढाकारासाठी ग्रीन पेटल-२०१८ या पुरस्काराने नुकतेच दिल्ली येथील हॉटेल उदमन येथे सन्मानित करण्यात आले. ग्रीन मॅपल फाउंडेशन या संस्थेमार्फत ग्रीन पेटल पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

समारंभाचे प्रमुख पाहुणे खासदार हरीनारायण राजभर व  अमरनाथ दुबे, संचालक विदेश मंत्रालय, भारत सरकार यांचे हस्ते सदर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कोराडी वीज केंद्राच्यावतीने मुख्य अभियंता अभय हरणे तर चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्यावतीने उप मुख्य अभियंता अनिल आष्टीकर, कार्यकारी रसायन शास्त्रज्ञ दौलत शिवणकर, वरिष्ठ रसायन शास्त्रज्ञ विजय येउल यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महानिर्मितीचे डॉ.नितीन वाघ, मुख्य महाव्यवस्थापक (पर्यावरण व सुरक्षितता) हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.
 महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी भारत सरकारच्या वने व पर्यावरण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार “त्री-सूत्री” दिली आहे त्यात पर्यावरण व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे तर संचालक “पाच-सूत्री” कार्यक्रमात वीज केंद्र परिसर सुधारणेवर विशेष भर दिला आहे. या दोन्ही अभिनव कार्यक्रमामुळे दिवसेंदिवस महानिर्मितीच्या वीज केंद्रात लक्षणीय सुधारणा दिसून येत आहेत.

औष्णिक वीज उत्पादन करताना पर्यावरण संरक्षण व संवर्धन विषयक सामाजिक जाणीवा व संवैधानिक निकष लक्षात घेऊन कोराडी व चंद्रपूर वीज केंद्रातील अधिकारी-कर्मचारी विशेषत्वाने काळजी घेत आहेत तर मागील काही वर्षात पर्यावरणीय क्षेत्रात उत्तम कार्य केल्याबद्दल कोराडी व चंद्रपूर वीज केंद्राला  राज्य व राष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्यात आले असल्याचे मुख्य अभियंते अभय हरणे व जयंत बोबडे यांनी सांगितले.