वकीलाची हत्या; आरोपीची आत्महत्या

नागपूर/प्रतिनिधी 
वकीलाला रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर स्वत:ही विष पिऊन आत्महत्या केली. जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या दारासमोर शुक्रवारी सायंकाळी ४.४५ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. 



अ‍ॅड. नारनवरे यानी  पदव्युत्तर विधी अभ्यासक्रमाचे व्याख्याते पदावरुन निवृत्तीनंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात प्रॅक्टीस सुरू केली. ते कोर्टातील कामकाज वगळता बराचसा वेळ अन्य काही वकील मित्रांसह राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयाच्या दारासमोर फूटपाथवर खुर्ची लावून बसायचे. लोकेश भास्कर हा देखील त्यांच्यासोबत सहकारी (ज्युनिअर) म्हणून काम करायचा. 
नेहमीप्रमाणे शुक्रवारी ४.४५ च्या सुमारास अ‍ॅड. नारनवरे त्यांच्या खुर्चीवर बसून असताना अचानक लोकेशने कुऱ्हाड काढली आणि अ‍ॅड. नारनवरे यांच्या डोक्यावर घाव घातला. एकाच घावात नारनवरे जोरात किंकाळी मारून फूटपाथजवळ पडले. किंकाळी ऐकून आजूबाजूची मंडळी त्यांच्याभोवती गोळा झाली. आरोपी लोकेशच्या हातात रक्ताने माखलेली कुऱ्हाड होती. त्यामुळे कुणी जवळ येण्याचे धाडस दाखवले नाही. ते पाहून आरोपीने अ‍ॅड. नारनवरे यांच्यावर कुऱ्हाडीचे आणखी घाव घातले. ते रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्यानंतर आरोपीने बाजूलाच ठेवलेली विषारी द्रवाची बाटली काढली आणि त्यातील विष प्राशन केले. दरम्यान, अत्यंत संवेदनशील तसेच वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. वकील, कोर्टात तारखेच्या निमित्ताने आलेले आरोपी, पक्षकार आणि त्यांचे नातेवाईक यांनी एकच आरडाओरड केली. ते पाहून बंदोबस्तावर असलेले पोलीस धावले. त्यांनी आरोपी लोकेशला ताब्यात घेतले. त्याच्याजवळची कुऱ्हाड तसेच विषारी द्रवाची बाटली जप्त केली. अत्यवस्थ अवस्थेतील अ‍ॅड. नारनवरे यांना पोलिसांनी वाहनात टाकले. त्यांना तसेच आरोपी लोकेशला पोलिसांनी मेयो हॉस्पिटलमध्ये नेले.