मायणीला येणाऱ्या टेंभू योजनेचे काम प्रगतीपथावर

काम पाहण्यासाठी लोकांची वर्दळ वाढली 


मायणीः-ता.खटाव जि. सातारा(सतीश डोंगरे)
        खटाव तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या मायणी परिसराला वरदान ठरणाऱ्या टेंभू योजनेचे काम सध्या प्रगती पथावर असुन येत्या काही महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी माहिती टेंभूच्या अभियंत्यांनी दिली आहे . या कामाची मायणी सह परिसरात प्रचंड उत्सुकता असून मोठ्या प्रमाणावर लोक याठिकाणी भेट देऊन कामची पाहणी करीत आहेत .

      टेंभूच्या मुख्य कालव्यापासून भिकवडी गावापर्यंत चर काढण्याचे काम सुरु असुन या मार्गात  २०० मिटर कठीण खडक लागला असून याचे ब्लास्टिंगचे काम सुरु आहे .लवकरच युद्धपातळीवर चालू असलेले हे काम पूर्ण होऊन मायणी ब्रिटिशकालीन तलावात हे पाणी येणार असून या कामाची प्रचंड उत्सुकता जनसामान्यात असून मायणीच नव्हे ते अन्य आसपासच्या गावातील लोक या ठिकाणी भेट देऊन दुष्काळी पट्ट्यासाठी वाहणाऱ्या टेंभू या जीवनदायी योजनेचे पाणी मायणी तलावात येत आहे या ऐतिहासिक कामाची पहाणी करून पाण्याची "चातक पक्षाप्रमाणे "वाट पहात आहेत.

काम पूर्णत्वास गेल्यानंतर या योजनेचे पाणी भिकवडी गावच्या ओढ्यात येऊन पुढे साडेतीन किमी प्रवास करून मायणी ब्रिटिश कालीन तलावात येणार आहे.सदरचे पाणी पिण्यासाठी असुन वर्षातुन दोन वेळा हा तलाव भरून घेतला जाणार आहे . या तलावात येणाऱ्या या पाण्याचा आसपासच्या गावांनाही पिण्याच्या पाण्यासाठी फार मोठा फायदा होणार आहे .या कामाच्या पाहणीच्या वेळी जेष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके, प्रल्हाद घोलप,बाळासाहेब माळी,रघुनाथ पवार गुरुजी व आबासाहेब देशमुख याची उपस्थित होते.


डॉ दिलीपराव येळगावकर यांच्या पुढाकारानं पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असलेले हे टेंभू योजनेचे काम लवकर पूर्ण झाल्यानंतर सध्या येरळवाडी तलावातून सुरु असलेल्या मायणी प्रादेशिक पाणी योजनेवरील ताण कमी होणेस मदत होणार असून युवा नेते ,सरपंच सचिन गुदगे याच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन केल्याने मायणीकराना पाणी पुरवठा सुरळीत होत आहे . यात आणखी भर होऊन टेंभू योजनेचे पिण्याचे पाणी तलावात आल्यास मायणी व पंचक्रोशीतील जनता सुखावणार आहे.