वाडी नगर परिषद मध्ये ४५ पैकी ३१ कर्मचाऱ्यांचे समायोजन

१५ कर्मचारी नगर परिषद मध्ये तर 
१६ कर्मचाऱ्यांचे इतर ठिकाणी होणार समायोजन 




वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे
कायद्याने चाला, कायद्याने बोला आणि कायद्याचेच ऐका ही बाब न्यायप्रिय व्यवस्थेसाठी सर्वोत्तम समजली जाते. परंतु वाडी नगर परिषदेतील कर्मचारी हे कायद्याने सांगितल्यानुसार आकृतीबंधापासुन वंचित होते . तीन वर्षापासुन नगर परिषद मध्ये समायोजन न झाल्यामुळे नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत होता .वाडी ग्रामपंचायतची वाडी नगर परिषद झाली परंतु कर्मचाऱ्यांच्या समायोजनेचा प्रश्न सुटलेला नव्हता शेवटी धीरज का फल मिठा होता है ,अखेर तीन वर्षांनी ४५ कर्मचाऱ्यांपैकी ३१ कर्मचाऱ्यांना दि . २० डिसेंबर रोजी आदेश क्रमांक नपाप्रा अ.का. १९ ( १ ) /कावि २८१ / २०१८ नुसार अखेर न्याय मिळाला .

वाडी नगर परिषद मध्ये १५ कर्मचाऱ्यांचे समायोजन होणार असून त्यामध्ये दहा लिपिक, चार शिपाई, एक विजतंत्रीचा समावेश आहे . परंतु १४ सफाई कर्मचारी निरक्षर असल्यामुळे त्यांचे आकृतिबंधनुसार समायोजन झाले नाही .वाडी नगर परिषदची स्थापना झाल्यावर ग्रामपंचायत मधील कार्यरत ४५ कर्मचारी शासनस्तरावरील समायोजनापासून अलीप्त होते . त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून समायोजन करण्याची मागणी लावून धरली होती . नगर परिषद स्थापनेनंतर ४५ कर्मचाऱ्यांचा समायोजनाचा प्रस्ताव २०१५ मंत्रालय स्तरावर पाठविला होता . परंतु मंत्रालय स्तरावरून समायोजनाची प्रकीया थंडबस्त्यात पडून होती .१ जानेवारी २०१९पासुन नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा सुध्दा दिला होता . नगरपरिषदेतील कार्य व्यवस्थित चालावे म्हणून ३० सप्टेंबर २०१५ रोजी संवर्ग कर्मचाऱ्यांच्या पदांना आकृतीबंध करण्याची परवानगी मिळाली होती .नगर विकास खात्याच्या आदेशाप्रमाणे आता सर्व पदांचे विभागातील नगर परिषद व नगरपंचायत यांची तपासणी करुन २०१६ मध्येच एक समीती सुध्दा नेमण्यात आली होती . त्या समीतीने वाडी नगर परिषदचा आकृतीबंधात समावेश करण्याची प्रक्रीया केली . आजपर्यत वाडी नगरपरिषदमधील कर्मचाऱ्यांचा आकृतीबंधात समावेश न झाल्यामुळे कर्मचारी शासकीय लाभापासुन वंचीत होते . वाडी नगर परिषद मधील कर्मचाऱ्यांची समस्या दुर व्हावी म्हणून मुख्याधिकारी राजेश भगत सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करीत होते . भाजपाचे नागपूर जिल्हा महामंत्री , नगराध्यक्ष प्रेम झाडे यांनी मुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री यांच्याकडे ही समस्या लावुन धरुन कर्मचाऱ्यांचा मोठा प्रश्न निकाली काढला .३१ कर्मचाऱ्यांनी मुख्याधीकारी राजेश भगत, उपमुख्याधिकारी आकाश सहारे , नगराध्यक्ष प्रेम झाडे , उपाध्यक्ष राजेश थोराने , सभापती ,सर्व नगरसेवक तसेच शासनाचे धन्यवाद मानुन आनंदोत्सव साजरा केला .