महाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान


नवी दिल्ली, 7 : उत्कृष्ट कार्य करणा-या महाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना आज केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्काराने गौरविण्यात आले.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने येथील प्रवासी भारतीय भवनात आयोजित कार्यक्रमात ‘राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कार 2017-18’चे वितरण करण्यात आले. केंद्रीय महिला व बाल विकास राज्य मंत्री डॉ. विरेंद्र कुमार व सचिव राकेश श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने चालविण्यात येणा-या ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना’ आणि ‘राष्ट्रीय पोषण आहार’योजनेंतर्गत विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणा-या देशातील विविध राज्यांतील अंगणवाडी सेविकांना यावेळी पुरस्कार वितरीत करण्यात आले. महाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांनाही यावेळी सम्मानीत करण्यात आले.

यावेळी अमरावती जिल्हयात वरूड बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत कुरळी अंगणवाडीच्या अर्चना सालोडे आणि टेंभुलखेडा अंगणवाडीच्या वनिता कोसे या अंगणवाडी सेविकांना सन्मानीत करण्यात आले. तसेच, चंद्रपूर जिल्हयातील वरोरा बाल विकास योजना प्रकल्पांतर्गत येनसा अंगणवाडीच्या अंजली बोरेकर, कोल्हापूर जिल्हयातील करवीर प्रकल्पांतर्गत हनबरवाडी अंगणवाडीच्या अक्काताई ढेरे आणि ठाणे जिल्हयातील मुंब्रा प्रकल्पांतर्गत रेती बंदर अंगणवाडीच्या स्नेहा क्षिरसागर या अंगणवाडी सेविकांना यावेळी सन्मानीत करण्यात आले.

महाराष्ट्रातील या सर्व अंगणवाडी सेविकांनी विविध जनजागृती कार्यक्रम हाती घेत लहान मुलांची आधार कार्ड नोंदणी, कुपोषण मुक्त अभियान,स्वच्छ भारत अभियान, स्वानंदी अभियान, ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ अभियान यशस्वीपणे राबविले आहे. त्यांच्या कार्याची नोंद घेवून त्यांना राष्ट्रीय अंगणवाडी पुरस्कार प्रदान करण्यात आले.