राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रलंबित थकबाकी मिळणार

शिक्षक महामंडळ सभेची फलश्रुती
नागपूर/अरुण कराळे:
शिक्षक साठी इमेज परिणाम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळ पदाधिकाऱ्यांसोबत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी आयोजित केलेल्या सहविचार सभेतील निर्णयाप्रमाणे वेतन अनुदानाच्या थकबाकी बाबतची प्रलंबित सर्व प्रकरणे कोणत्याही परिस्थितीत गुरुवार १० जानेवारी २०१९ पूर्वी अदा करण्यात यावी असे आदेश शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी त्यांच्या ५ नोव्हेंबर २०१८ च्या पत्रान्वये दिल्यामुळे लवकरच वेतन अनुदानाची थकबाकी रक्कम राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

२ नोव्हेंबर २०१८ ला पुणे येथील शिक्षण आयुक्तांचे दालनात महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांचे प्रमुख उपस्थितीत सहविचार सभा संपन्न झाली. या सभेमध्ये अनेक विषयावर चर्चा होऊन अनेक समस्या तात्काळ निकाली काढण्यात आल्या. वेतन अनुदानाच्या थकबाकीबाबतच्या प्रलंबित प्रकरणाबाबत याच सभेत विस्तृत चर्चा होऊन थकबाकी देयके त्वरित निकाली काढण्यासाठी वेळापत्रक तयार करुन देयके सादर झाल्यानंतर निपटारा होण्याच्या दृष्टीने त्याचे टप्पे निश्चित करण्याची मागणी महामंडळ पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा व विभाग स्तरावर शिबीराचे आयोजन आणि संचालनालय स्तरावर १० जानेवारी २०१९ पूर्वी थकबाकी देयकांना मान्यता देण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी आपल्या ५ नोव्हेंबरच्या पत्रान्वये दिले आहेत. 

शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांचे अध्यक्षतेखाली व सहसंचालक राजेंद्र गोधने यांचे उपस्थितीत संपन्न झालेल्या या सहविचार सभेस महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे, सरचिटणीस व्ही.जी. पवार, उपाध्यक्ष आनंदराव कारेमोरे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष एस.जी. बरडे, सरकार्यवाह सुधाकर अडबाले, उपाध्यक्ष अरविंद देशमुख, जयप्रकाश थोटे, प्रमोदराव रेवतकर, महेंद्र सालंकार, अनिल गोतमारे, संजय वारकर, धनराज राऊत, प्रमोदराव खोडे आदि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.