महाराजबागेतील बिबट्याचा मृत्यू

नागपूर/प्रतिनिधी:
महाराजबागेत मागील ११ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ‘बाल्या’ नामक बिबट्याचा मूत्रपिंडाच्या आजारामुळे शनिवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. हा चौदावर्षीय बिबट्या मागील आठ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता.

गावामध्ये धुमाकूळ घालत असलेल्या या बिबट्याला चंद्रपूर जिल्ह्यातीलधाबा वनपरिक्षेत्रातून १४ नोव्हेंबर २००८ रोजी जेरबंद करून महाराजबागेत आणण्यात आले होते. तेव्हापासून तो महाराजबागेतच वास्तव्यास होता. मूत्रपिंडाच्या आजाराने अत्यवस्थ असलेल्या या बिबट्यावर आठ दिवसांपासून उपचार सुरू होते. मागील काही दिवसांपासनू त्याने अन्नग्रहण करणेही सोडले होते. अखेर शनिवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. 

बिबट्याचे शवविच्छेदन डॉ. प्रशांत सोनकुसरे आणि डॉ अभिजित मोटघरे यांनी केले. महाराजबागेत त्याच्यावर शनिवारी सकाळी ११.१५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ डी. एम. पंचभाई, डॉ. सुनील बावस्कर, डॉ. अभिजित मोटघरे व डॉ. प्रशांत सोनकुसरे तसेच प्राणिसंग्रहालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते. यापूर्वी ऑगस्ट २०१८ महिन्यात महाराजबागेत अनामिका नामक मादी बिबटाचा मृत्यू झाला होता.