आजपासून विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

नागपूर/प्रतिनिधी:
वीज ग्राहक आणि विज कर्मचा-यांमध्ये विद्युत सुरक्षेप्रती जागरुकता निर्माण व्हावी, ग्राहकांना अपघातविरहीत वीज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फ़े येत्या दि. 11 ते 17 जानेवारी दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा शुभारंभ राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शुभहस्ते शुक्रवार 11 जानेवारी रोजी चिटणविस सेंटर, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे सकाळी 11.00 वाजता करण्यात येईल. विजेमुळे होणा-या अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि राष्ट्रीय संपत्तीचे जतन करणे या प्रमुख उद्देषाने दरवर्षी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येते.

यावेळी ऊर्जा राज्यंत्री मदन येरावार, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, खासदार  कृपाल तुमाने, हे प्रामुख्याने उपस्थीत राहणार आहे. याशिवाय आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार अनिल सोले, आमदार गिरीष व्यास आमदार सुनील केदार, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधीर पारवे, आमदार मिलींद माने, आमदार सुधाकर कोहळे, आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर आदी मान्यवर उपस्थित राहतील. याप्रसंगी “विदुयत तरंग” या स्मरणिका - 2019 आणि विदुयत कंत्राटदार संघटना, नागपूर यांचे दैनंदिनीचे विमोचन ऊर्जामंत्री यांचे हस्ते करण्यात येईल. या स्मरणिकेत विद्युत सुरक्षा सप्ताह 2016 ते 2018 मधील विविध कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला आहे. याप्रसंगी आयोजित प्रदर्शनात विदुयत अपघात कश्या प्रकारे घडतात या संबंधी स्वयंचलीत मॉडेल्स सादर करण्यात येणार आहेत. अपघातविरहीत वीजपुरवठा हे राज्य शासनाचे ध्येय असून यासाठी वीज ग्राहकांची साथ अत्यंत मोलाची आहे. दैंनंदिन आयुष्यात लहान-सहान गोष्टी विचारात घेतल्यास विजेमुळे होणारे अपघात हमखास टाळता येणे शक्य आहे, यादृष्टीने या सप्ताहादरम्यान ग्राहक प्रबोधन करण्यात येणार आहे.

या सप्ताहादरम्यान सर्वत्र विदुयत सुरक्षेबाबत कार्यशाळांसोबतच नागपूर शहरातील प्रत्येक चौकातील एल.सी.डी. स्क्रीनवर विदुयत सुरक्षीततेबाबत सुरक्षा संदेश प्रदर्शित करण्यात येणार आहे. शहरातील एफ.एम.चॅनलवर सुध्दा विदुयत सुरक्षीततेबाबत सुरक्षा संदेश प्रसारीत करण्यात येणार आहे. जयस्तंभ चौक, व्हेरायटी चौक, महानगर पालीका मुख्य इमारत, मेडीकल चौक, रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बसस्थानक या शहराच्या प्रमुख ठिकाणी विद्युत सुरक्षेबाबतचे पोस्टर्स/बॅनर्स लावण्यात येणार आहे. तसेच रवी भवन, टी पॉईंट मॉरीस कॉलेज चौक, कळमना मार्केट, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, कामठी, मेडीकल चौक, रेल्वे स्थानक, मध्यवर्ती बसस्थानक येथे विदुयत सुरक्षेबाबतचे होर्डींग्स् लावण्यात येणार आहे. स्थानिक शाळा, शैक्षणिक संस्था, उद्योग, तंत्रनिकेतन, प्रशिक्षण संस्था येथे पोस्टर, स्लोगन स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहे. शहराच्या स्लम भागातही विदुयत सुरक्षीततेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच विदुयत निरीक्षण विभागातील अभियंते जिल्हयातील ग्रामीण भागातील शाळामध्ये विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे महत्व व विजेचा सुरक्षीत वापर या बाबत मार्गदर्शन करणार आहेत. विदुयत सुरक्षा सप्ताहाच्या उपक्रमांव्दारे राज्यात होणारे विदुयत अपघात कमी व्हावे असा प्रयत्न विदुयत  निरीक्षण विभाग, नागपूर व राज्यातील सर्व विदुयत निरीक्षणालय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग करीत आहे.

आज अज्ञान किंवा अतिआत्मविश्वास, अतिउत्साहामुळे दरवर्षी वीज अपघातात शेकडो बळी जातात, तर अनेकांना कायमस्वरुपी अपंगत्व येत असते. शे-पावशे रुपयांच्या वीजचोरीसाठी लाखमोलाच्या जीवाची बाजी लावल्या जाते, वीज तारांमधे अडकलेला पतंग काढायला जीव धोक्यात घातला जातो. वीज वाहिनीखाली घरांचे बांधकाम केल्या जाते, वीजपुरवठा खंडीत झाल्यास तो पुर्ववत करण्याचा प्रयत्न केल्या जातो, ओल्या हाताने विद्युत उपकरणे हाताळली जातात, ह्या सा-या गोष्टी म्हणजे साक्षात मृत्यूलाच आमंत्रण असल्याने ह्या गोष्टी टाळून अपघातविरहीत वीजपुरवठ्याच्या ध्येयात सर्वांनी सोबत करण्याचे आवाहन आयोजकांतर्फ़े करण्यात आले आहे.

हे लक्षात ठेवा

विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका.
विज वाहिनीच्या खाली किंवा जवळ कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नका.
अर्थीगची व्यवस्था असलेल्या थ्री-पीन असलेलीच उपकरणे वापरा.
परवाना धारक कंत्राटदाराकडूनच घरातील वीज वायरींग करून घ्या.
आयएसआय प्रमाणित वीज वायर्स, केबल्सचा वापर करा. 
अतिभार किंवा शॉर्टसर्कीटमुळे हानी होऊ नये याकरीता योग्य क्षमतेची एमसीईबी/ एमसीसीबी वापरा.
विद्युत खांब किंवा तणाव तारांना गुरेढोरे बांधू नका.
विद्युत प्रवाह शेतातील कुंपणात सोडू नका.
न्यूट्रल करीता उघड्या तारांचा वापर टाळून इन्सुलेटेड तारांचा वापर करा
तात्पुरते, लोंबकाळणारे वायर्स वापरू नका.
विजेचा अनधिकृत वापर टाळा.
विद्युत उपकरणे दुरुस्तीच्या वेळी, त्याचा वीजपुरवठा बंद करून प्लग काढला असल्याची खात्री करा.
कुलरमधे पाणी भरतांना स्लीपर्स घालाव्यात सोबतच कुलरचा प्लग काढला असल्याची खात्री करा.
वीज तारांखाली गुरे-ढोरे अथवा कापणी झालेले पीक ठेऊ नका.
कपडे वाळविण्यासाठी वीज तारांचा वापर करू नका.
विनाकारण वीज खांबावर चढू नका.
वीजेच्या तुटलेल्या तारा आढळल्यास महावितरण नजिकच्या कार्यालयाला किंवा 1912, 18002333435, 18001023435 या निशुल्क दुरध्वनी क्रमांकावर त्वरीत कळवा.

            उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
        प्रादेशिक कार्यालय, महावितरण, नागपूर