चंद्रपूर बुलेट्स सीपीएल चॅम्पियन

जेसीएल कप : व्हाईट एश उपविजेता
चंद्रपूर/प्रतिनिधी:

लाईफ फ़ॉऊंडेशनच्या वतीने आयोजित सीपीएल क्रिकेट स्पर्धेच्या जेसीएल कपवर यंदा चंद्रपूर बुलेट्स संघाने दिमाखात नाव कोरले.
रंगतदार अंतिम सामन्यात बलाढ्य व्हाईट अ‍ॅश संघाचा सात गडी राखून पराभव करीत चंद्रपूर बुलेट्सने ही स्पर्धा जिंकली. चंद्रपूर बुलेट्सला एक लाख ११ हजार १११ रुपये आणि चषक, तर उपविजेत्या व्हाईट अ‍ॅश संघाला ६६ हजार ६६६ रुपये आणि चषक प्रदान करण्यात आला. सकाळी११ वाजता अंतिम सामन्याला सुरुवात झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करण्यात आली.

प्रथम फलंदाजी घेत व्हाईट अ‍ॅश संघाने निर्धारित २० षटकात ११७ धावा केल्या. हे माफक आव्हान चंद्रपूर बुलेट्स संघाने लीलया पार केले. पाच षटके आणि सात गडी राखून बुलेट्स संघाने दणदणीत विजय मिळवला. सीपीएलचे हे सहावे पर्व होते. यात पहिल्यांदाच पोलिस विभागाच्या चंद्रपूर बुलेट्स संघाने विजयी होण्याचा मान पटकावला. सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्याला अतिरिक्त पोलिस अधीक्षक हेमराज राजपूत, वेकोलिचे महाप्रबंधक आभासचंद्र सिंग, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर,उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक, जनता करिअर लाँचरचे लीलाधर खंगार, ज्येष्ठ पत्रकार सुनील देशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी मनोगतात विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.
 ही स्पर्धा पहिल्यांदाच टॅर्फ खेळपट्टीवर खेळवण्यात आली. टी-२० पद्धतीने खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी झाले होते. सलग सतरा दिवस ही लेदारबॉल क्रिकेट स्पर्धा चालली. या स्पर्धेत मालिकावीर व्हाईट अ‍ॅशचा अजहर शेख, सामनावीर प्रवीण लांडगे, उत्कृृष्ट फलंदाज केवल आंबटकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जावेद, यष्टीरक्षक विशाल तांड्रा, गोलंदार वैभव नन्नावरे यांना रोख आणि चषक भेट देण्यात आले. सामन्यांचे आणि कार्यक्रमाचे संचालन मोंटू सिंग यांनी केले. आयोजनासाठी लाईफ फौऊंडेशनचे उपाध्यक्ष रोषण दीक्षित, आरीफ खान, सचिव सुनील रेड्डी, कोषाध्यक्ष बॉबी दीक्षित, सहकोषाध्यक्ष नाहीद सिद्दिकी, संघटन सचिव वसीम शेख, सहसचिव कमल जोरा, डॉ. किशोर भट्टाचार्य, शैलेंद्र भोयर, शहजाद सय्यद, हर्षद भगत, एजाज यांनी परिश्रम घेतले.