बांबू संशोधन आता अधिक वेगवान होणार


बांबू क्षेत्राची गुणात्मक वाढ आणि दर्जेदार उत्पादन पद्धती यासाठी सामंजस्य करार
- सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 29 : राज्यात विविध बांबू प्रजातींची निर्मिती, बांबू क्षेत्राचा सर्वांगीण विकास, लागवड आणि संशोधन आता अधिक वेगवान होणार असून त्यासाठी आजचा सामंजस्य करार निश्चित उपयुक्त सिद्ध होईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले

आज सह्याद्री अतिथीगृहात वनमंत्री श्री मुनगंटीवार आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र बांबू विकास मंडळ, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था आणि बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमास वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी. एस. के.रेड्डी, राष्ट्रीय सुगी पाश्च्चात तंत्रज्ञान संस्थे चे संचालक सतीश पाटील, बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, संस्थेचे सल्लागार गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

या करारामुळे राज्यातील बांबू क्षेत्र अधिक गतीने विकसित होईल, बांबूच्या टिशू कल्चर ची निर्मिती, त्याची नर्सरी निर्माण करण्याच्या कामाला गती येईल. शेतकऱ्यांच्या शेतात बांबू लागवडीला यातून प्रोत्साहन मिळेल. सामूहिक उपयोगिता केंद्राची निर्मिती, भाऊ केंद्रांची स्थापना, प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आदान प्रदान, बांबूची काढणी आणि हाताळणी, बांबू क्षेत्राची गुणात्मक वाढ आणि दर्जेदार उत्पादन पद्धती चा विकास या सर्वच कामात हा सामंजस्य करार महत्वाचा ठरणार आहे, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.