गायमुखवाडी ट्रॅव्हल्स- पिकअप भीषण अपघातात ३ ठार २० जखमी

जुन्नर /आनंद कांबळे:

नगर कल्याण राष्ट्रीय मार्गावरील गायमुखवाडी ( ता. जुन्नर ) येथे विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी गेलेल्या नगर येथील ट्रॅव्हल्स व कांदयाने भरलेल्या पिकअप ४o७ ची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले .

टॅव्हल्स मधील पंधरा ते वीस विद्यार्थी जखमी झाले. जखमीमध्ये काही शिक्षकांचा समावेश असल्याचे बोलले जात होते. हा अपघात गुरुवार दि. १७ रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास घडला. याबाबत पोलिस निरीक्षक टी.वाय. मुजावर व सहायक पोलिस निरीक्षक रमेश खुणे अधिक माहिती घेताना सांगितले की, अहमदनगर येथील डॉन बॉस्को विद्यालय सावेडी येथील विद्यार्थ्यांच्या सहलीची खाजगी बस क्र. एम.एच. १६ बी.सी. २६५१ वसईकडून नगरकडे जात असताना जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडीत आळेफाटया कडून मुंबईकडे कांद्याने भरलेला पिकअप ४०७ क्रमांक एमएम१६ ए वाय ४१८९ ची समोरासमोर जोरदार धडक होऊन पिकअप चालकासह अन्य दोघे ठार झाले.
पिकअप चालक महादेव बाबाजी खोसे(वय४८), बसचा क्लिनर शैलेश बाबासाहेब निमसे (वय१९) त्यात एका शिक्षकाचा समावेश आहे. शिक्षकाचे नाव समजू शकले नाही.
अपघात घडल्यानंतर ट्रॅव्हल्स व पिकअप गाडीने पेट घेतला . या अपघातात ट्रॅव्हल्स मधील १५ ते २० सहलीतील विद्यार्थी जखमी झाल्याचे समजते.जखमी विद्यार्थ्यांना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघात स्थळी ओतूर व आळेफाटा पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. घटनास्थळी जुन्नरच्या पोलिस उपविभागीय अधिकारी दिपाली खन्ना यांनी भेट दिली.