वाघिणीच्या तावडीत सापडलेला कॅमेरा चकनाचूर






  चंद्रपूर
ताडोबा-अंधारी अभयारण्य वाघासाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथे वाघांकडून होणार्‍या कुरघोडीसाठीही प्रसिद्ध आहे. वाघ कधी मजुराचा टिफीन पळवून त्यावर ताव मारतो, तर कधी दुधाची बॉटल तोंडात घेणे आदी अचंबित करणारे प्रकार घडले आहेत. पण सोमवार, ६ मे रोजी सकाळच्या सुमारास अजबच किस्सा घडला. यात पर्यटकाचा एक महागडा कॅमेरा त्याच्या हातून ताडोबात पडला आणि काही अंतरावर असलेल्या वाघिणीने त्यावर झडप घातली. दरम्यान आणखी दोन बछडे आले आणि कॅमेरा ओढत नेला. वाघांच्या या खेळात कॅमेर्‍याची मात्र ऐसीतैसी झाली. यात सदर पर्यटकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
वाघांचे जवळून दर्शन घेणे, त्याची विविध मुद्रा कॅमेर्‍यात टिपण्यासाठी पर्यटकांची धडपड असते. काही वेळा तर सेल्फीच्या नादात पर्यटकाचा मोबाईल किंवा कॅमेरा हातातून निसटून खाली पडतो. वाघ आजूबाजूला नसेल तर गाडीवरूनच खाली पडलेली वस्तू उचलता येईल. पण वाघ असेल तर मात्र पर्यटकांना त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. याच घटनेची प्रत्यक्ष प्रचीती सोमवारी ताडोबात एका पर्यटकाला आली. त्यात त्याचा लाखो रुपयांचा कॅमेरा वाघाच्या तावडीत सापडून चकनाचूर झाला. नितीन रहाटे हा पर्यटक आपल्या मित्रांसोबत जंगल दर्शनाला गेला असता त्याला हा अनुभव आला. त्याने ही घटना सोशल मीडियावर शेयर केली आणि झालेला घटनाक्रम सांगितला.
सोमवारी ताडोबा येथे व्याघ्र दर्शनाचा आनंद लुटण्यासाठी नितीन रहाटे आले होते. या दरम्यान ८ वाघांचे दर्शन झाले. त्यात २ वाघीण, १ वाघ आणि चार बछडयांचा समावेश आहे.
यावेळी त्यांच्यासोबत जिप्सीमध्ये वाईल्ड फोटोग्राफर तथा सेवानवृत्त कर्नल डॉक्टर अरुण रस्तोगी हेही सफारी करीत होते. दरम्यानच्या काळात चुकून निकोन कंपनीचा महागडा कॅमेरा हातातून निसटला आणि खाली पडला. मात्र १0 मिटरच्या अंतरावरच तारा नामक वाघीण आपल्या बछडयासह उभी होती. कॅमेरा खाली पडताच खाद्य समजून वाघीण व तिचे बछडे कॅमेर्‍याच्या दिशेने धावले आणि कॅमेर्‍याशी खेळू लागले. दरम्यान कॅमेर्‍याला लागून असलेली लेन्स वेगळी काढली आणि पाहता-पाहता वाघिणीने कॅमेर्‍याची चांगलीच तोडफोड केली.
त्यामुळे त्याचे स्पेअर पार्ट वेगवेगळे झाले, डोळ्यासमोर वाघिणीने केलेली कॅमेर्‍याची दुर्दशा पाहून रस्तोगी यांचा जीव कासावीस झाला. लाखमोलाच्या कॅमेर्‍याची वाघिणीने क्षणात वाट लावली.