आता आधार कार्ड असेल तर लगेच मिळणार पॅन कार्ड, अर्थमंत्र्यांची घोषणा

आता आधार कार्ड असेल तर लगेच मिळणार पॅन कार्ड, अर्थमंत्र्यांची घोषणा



निर्मला सीतारामन यांनी आधार कार्ड असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला लगेचच पॅन कार्ड मिळू शकेल अशी घोषणा केली आहे.

नवी दिल्ली 
- केंद्रीय अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात शेती, उद्योग आणि शिक्षणामध्ये भरीव तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड संदर्भात अर्थमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे प्रत्येक कामासाठी उपयोगी पडतं. तसेच सरकारी योजनांसाठी ते लिंक करणं गरजेचं झालं आहे.  

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आधार कार्ड असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला लगेचच पॅन कार्ड मिळू शकेल अशी घोषणा केली आहे. सरकारने पॅन कार्ड मिळण्याची प्रक्रिया ही अधिक सोपी केली आहे. इन्स्टंट अलॉटमेंट सिस्टम ही सरकारच्यावतीने लाँच करण्यात आली आहे. यामुळे आधार कार्ड असेल तर लगेचच पॅन कार्ड मिळणार आहे. आतापर्यंत पॅन कार्ड काढण्यासाठी मोठी प्रकिया होती. मात्र आता सरकारने ते काम सोपं केलं आहे.   
प्राप्तिकर विभागाने पॅन-आधार लिंक करण्याची मुदत मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे करदात्यांनी पॅन कार्ड अजूनही आधार कार्डशी लिंक केले नसेल तर त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. 31 डिसेंबरपर्यंत पॅन कार्डआधार कार्डशी लिंक करणे सक्तीचे आहे, याची आठवण प्राप्तिकर विभागाने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी  एका जाहीर निवेदनाद्वारे करदात्यांना करून दिली होती. मात्र, आता प्राप्तिकर विभागाने  पॅन-आधार लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारने मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे.