चंद्रपूरमध्ये पुण्याहून आलेल्या 1085 रेल्वेच्या प्रवाशांना केले होम क्वारंटाईन



कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन पोलीसांची घेणार मदत
चंद्रपूरमध्ये पुण्याहून आलेल्या 1085 रेल्वेच्या प्रवाशांना केले होम क्वारंटाईन

Ø  आता 40 विदेशातून आलेले नागरिक निगराणीमध्ये

Ø  शनिवारी आणखी 7 विदेशातून आलेले नागरिक दाखल

Ø  होम कॉरेन्टाईन न पाळणाऱ्यांवर कलम 188सीआरपीसी व आयपीसीच्या 269/270कलमान्वये कारवाई करणार

Ø  विदेशातून आलेल्या नागरिकांनी तात्काळ 07172-270669 क्रमांकावर माहिती दयावी

Ø  पुण्यावरून आलेल्या सर्व नागरीकांनी 14दिवस घरामध्ये थांबावे

Ø  उद्या सकाळी 7 वाजता पासून जनतेचा कर्फ्यू पाळण्याचे आवाहन

Ø  आजपासून सर्व दुकाने पुढील आदेशापर्यंत बंद

Ø  जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने मात्र सुरू राहणार

चंद्रपूर,दि.21 मार्च : चंद्रपूरमध्ये विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने आपली माहिती स्वतःहून देणे आवश्यक आहे. माहिती लपविल्याचे लक्षात आल्यास त्यांच्यावर सीआरपीसीच्या 188 व आयपीसीच्या 269 ,270  कलमान्वये कार्यवाही करण्यात येईलअसे स्पष्ट आदेश आज जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. चंद्रपूर शहरांमध्ये जिल्हा बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांवर प्रशासन लक्ष ठेवत असून आज पुण्यावरून विशेष रेल्वेने आलेल्या 1085 प्रवाशांना होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. पुण्यावरून आलेल्या सर्व नागरिकांनी पुढील 14 दिवस घरातच राहावेअसे स्पष्ट निर्देश त्यांना देण्यात आले असून या सर्व नागरिकांच्या हातावर होम कॉरेन्टाईनचे स्टॅम्प  मारण्यात आले आहे. हे नागरिक रस्त्यावर दिसल्यास पोलिसांची मदत घेण्यात येईलअसे सक्त निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. तसेच बाधित रुग्णांची संख्या सुद्धा वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासनाने सक्त पाऊले उचललेली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यासंदर्भात आज यासंदर्भात सक्त निर्देश जारी करताना विदेशातून आलेल्या नागरिकांनी व पुणे येथून आलेल्या सर्व प्रवाशांनी पुढील 14 दिवस घरातच राहावे असे स्पष्ट केले आहे. सुजाण नागरिक बनून आपल्या घरातील अन्य सदस्य व समाजातील सदस्यांसोबत संपर्कात येऊ नये. अन्य नागरिकांची देखील स्वतः सोबत काळजी घ्यावी. कोरोनासोबत लढतांना संपर्क न येऊ देणे. ही सर्वात मोठी बाब असून त्यासाठी कोरोना प्रसारणाची कळी तोडावी लागणार आहे. त्यासाठी उद्यापासून कोणीही  आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडता कामा नयेअसे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.

 जिल्ह्यामध्ये 144 जमावबंदी ची कलम लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्रित येऊ शकत नाही.अशा पद्धतीने कुठेही जमाव दिसल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईलअसेही स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी वरिष्ठ प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी यांनी आज चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वे स्टेशन वर आलेल्या सर्व प्रवाशांना होम कॉरेन्टाईन करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणुकीच्या काळात वापरतात त्याच पद्धतीच्या शाईचा वापर यासंदर्भात स्टॅम्पिंग करताना करण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रवाशांनी व विदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला या विषाणूच्या फैलावापासून प्रतिबंधित करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आपल्या आरोग्य संदर्भात कोणतीही भीती वाटल्यास जिल्हा सामान्य रुग्णालयातील 07172-270669 ,जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये 07172-261226 व चंद्रपूर महानगरातील नागरिकांनी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 07172-254614  तसेच जिल्हा आपत्ती कक्षाच्या टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

चंद्रपूर 765 तर बल्लारपूरमध्ये 320 पुण्याचे प्रवाशी :

चंद्रपूर रेल्वे स्थानकावर दुपारी 2 वाजता पुण्याहून आलेली पुणे काझीपेठ या रेल्वेनी मोठ्या संख्येने पुण्याहून प्रवासी चंद्रपूरला आले तेव्हा आलेल्या सर्व प्रवाशांची सविस्तर माहिती घेऊनथर्मल स्क्रीनिंग करून त्यांना होम क्वारंटाईन   केले आहे. तसेच त्यांना 14 दिवस निगराणीखाली ठेवणार आहे. तसेचपुण्याहून चंद्रपूरकडे येणाऱ्या सर्व  रेल्वेतील प्रवाशांची संपूर्ण माहिती घेऊन त्यांना होम क्वारंटाईनच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

बल्लारपूर येथे स्वतः जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनारजिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोडयांच्यासह बल्लारपूर नगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
तर रेल्वे स्थानकावर होम क्वारंटाईनच्या प्रक्रियेच्या वेळेस उपजिल्हा निवडणूक अधिकारी संपत खलाटेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळेउपायुक्त गजानन बोकडेचंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंडस्टेशन मास्तर के.एस.एन.मूर्तीमनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.किर्ती राजुरवार,डॉ.वनिता गर्गेलवार तसेच राज्य व रेल्वे पोलीस अधिकारी तर जिल्हा आरोग्य विभागाचेमहानगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अशी होती  प्रक्रिया:

रेल्वे प्रवासी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर अशा प्रवाशांची सविस्तर माहिती नोंदविण्यासाठी प्रवाशांना नोंदणी कक्षामध्ये नेण्यात आले नंतर त्यांची थर्मल स्क्रीनिंग करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला नंतरच त्यांना रेल्वे स्थानकांवरून घरी पाठविण्यात आले.

या प्रक्रियेमध्ये रेल्वे स्थानकावर  एकूण 10 नोंदणी कक्ष,5 थर्मल स्क्रीनिंग कक्ष व होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यासाठी कक्ष उभारण्यात आले होते. यावेळी 765 इतक्या प्रवाशांची या कक्षामध्ये नोंदणी व्यतिरिक्त कोरोना प्रतिबंध उपाययोजना विषयी मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.

यावेळी प्रवाशांना घाबरून न जाता कोरोना विषाणू प्रतिबंध करण्या संदर्भात,   स्वतःची व इतरांची काळजी घेण्यासंदर्भात  मार्गदर्शन  करून होम क्वारंटाईनच्या सूचना देण्यात आल्या. सोबतच प्रशासनाच्या सूचना  पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.