चंद्रपूरमध्ये लॉक डाऊन 'जैसे थे ' केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह : जिल्हाधिकारी




चंद्रपूरमध्ये लॉक डाऊन 'जैसे थे '
केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह : जिल्हाधिकारी

✨ पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील 46 लोकांची संपर्क सूची तयार
✨ जवळच्या दहा लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले
✨ पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर ; दर तासाला आढावा
✨ यापूर्वी ज्यांना परवानगी आहे ते दुकाने उघडली जातील
✨ कन्टेनमेंट झोनमध्ये जाण्या येण्याची १४ दिवस परवानगी नाही
✨ बाहेर गावावरून येणाऱ्या प्रत्येकाला कॉरेन्टाइन होणे आवश्यक
✨ सरकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ कामावर रुजू होण्याचे निर्देश
चंद्रपूर दि. ४ मे : चंद्रपूरमध्ये केवळ एक रुग्ण पॉझिटिव्ह आहे. या रुग्णाची प्रकृती उत्तम असून त्याच्या संपर्कात आलेल्या ४६ लोकांची संपर्क सूची करण्यात आली आहे. संशयित 10 स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून कंटेनमेंट झोनमध्ये पुढील 14 दिवस सर्वांना येणे-जाणे बंद करण्यात आले आहे. जिल्ह्यांमधील लॉक डाऊन कायम असून जीवनावश्यक वस्तू वगळता कोणत्याही नव्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे.
आज दुपारी जारी केलेल्या व्हिडिओ संदेशामध्ये जिल्हा प्रशासनातील प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती घेतल्याशिवाय समाज माध्यमांवर कोणतेही वृत्त प्रसारित करू नये, अपप्रचार होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी अशी सूचना केली आहे.
शहरांमध्ये कृष्ण नगर भागात एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.रात्रपाळी सुरक्षा रक्षक म्हणून हा कर्मचारी ज्या ठिकाणी काम करत होता. त्या संपूर्ण इमारतीला देखील सील करण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 46 लोकांची संपर्क सूची करण्यात आली आहे. तसेच संशयित दहा लोकांचे स्वॅप तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या रुग्णाची दर तासाला तपासणी होत असून प्रकृती स्थिर आहे. या संदर्भातल्या कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
कृष्णनगर वस्तीच्या आसपास असणाऱ्या इंदिरानगर, शास्त्रीनगर,बंगाली कॅम्प परिसराला देखील बंद करण्यात आलेले आहे. महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या परवानगी पासेस शिवाय कोणालाही या परिसरात खेळता येणार नाही.आरोग्य तपासणी व नोंदी घेणे सुरू असून याला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा,अशी सूचना त्यांनी केली आहे.
अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणात मजूर गावागावात परतत आहे. परतलेल्या मजुरांना 14 दिवस होम कॉरेन्टाइन करण्यात येत आहे.
तसेच जिल्ह्यात अडकून पडलेल्या अन्य राज्यातील मजुरांना देखील पाठविण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था,अनेक संघटना मोठ्या प्रमाणात प्रशासनाला मदत करीत आहे.मात्र ही मोहीम सुरु असताना जिल्हाभरातील नागरिकांनी बाहेरून येणाऱ्या या नागरिकांच्या संपर्कात पुढील काही दिवस येऊ नये ,कुणाची प्रकृती बिघडल्यास वारंवार प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, शेकडो लोकांचे दूरध्वनी सुरू असल्यामुळे संयम ठेवून या यंत्रणेचा वापर करावा, अशा सूचनाही त्यांनी या संदेशात दिल्या आहेत.
कृष्णनगर परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांनी पुढील 14 दिवस घरातच राहणे अनिवार्य आहे. घरापर्यंत पोहोचणाऱ्या आरोग्य पथकाला आवश्यक माहिती द्यावी. बाहेर पडणे प्रतिबंधित असून पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन याठिकाणी झालेच पाहिजे असे निर्देशही त्यांनी दिले आहे.