चंद्रपूर जिल्ह्यात परत येणाऱ्या मजुरांची , नागरिकांची वैद्यकीय तपासणी करत खबरदारी च्या उपाययोजना कराव्या - आ. सुधीर मुनगंटीवार
*नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत कोरोनाला हरविण्याचे आवाहन*
चंद्रपूर जिल्ह्यात परराज्यातून अडकलेले मजूर , इतर राज्यात अडकलेले पर्यटक , इतर जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी व नागरिक यांना जिल्ह्यात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे . मात्र हे नागरिक जिल्ह्यात परत आल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करणे , त्यांना आवश्यकतेनुसार इन्स्टिट्यूशनल किंवा होम कोरन्टाइन करणे आदी बाबी प्रशासनाने काटेकोरपणे अमलात आणाव्या अशी सूचना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिका-यांना केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता मात्र आजच एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात परत येणारे मजूर असो , विद्यार्थी असो वा नागरिक प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी करण्याची आवश्यकता असून त्यांना इन्स्टिट्यूशनल किंवा होम कोरन्टाइन करणे अत्यंत गरजेचे आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू नये या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.प्रामुख्याने प्रत्येकाने आरोग्य सेतू ऍप मध्ये नोंदणी करून घेणे आवश्यक आहे . प्रशासनाने प्रत्येकाला ही नोंदणी सक्तीची करण्याची आवश्यकता आहे. आरोग्य सेतूच्या माध्यमातून आपल्या नजीक रुग्ण असेल तर त्याची माहिती होते त्यामुळे ह्याची अत्यंत गरज आहे. खबरदारीच्या उपायात आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे सुद्धा गरजेचे आहे. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी लॉक डाऊन संदर्भातील शिथिलते बाबत पुनर्विचार करून सुरक्षितता बाळगणे सुद्धा गरजेचे आहे . नागरिकांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करत कोरोना विरोधातील या लढ्यात योगदान द्यावे असे आवाहन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.