युगपुरुष स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजांच्या १४ मे जयंती निमित्त विशेष!





*युगपुरुष स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजांच्या १४ मे जयंती निमित्त शंभु-लेख ...*
दिनचर्या न्युज :-

स्वराज्य संकल्पक...शहाजीराजे, स्वराज्य मार्गदर्शक...राजमाता जिजाऊ, स्वfराज्य संस्थापक... छत्रपती शिवराय, त्याच बरोबर शिर्के घराण्याची कर्तृत्ववान लाडकी लेक..आणि छत्रपतींची रणरागिणी सून..म्हणजेच स्वराज्याच्या कुलमुखत्यार शंभुराजांची महाराणी..येसूबाई यांच्या खंबीर साथीने "मराठे" या कणखर शब्दाखाली..अवघ्या बहुजनांना एकत्र आणत अठरापगड जातींचे स्वराज्य निर्माण करून, क्रूर सत्तेला चारीमुंड्या चित करत मोघलांचा कर्दनकाळ ठरलेले म्हणजेच स्वराज्याचे संरक्षक...मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले होय.
मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासात रोमारोमात ज्यांचे नाव अखंड घ्यावे, असे राजे म्हणजे छत्रपती शिवरायांचे सर्वात मोठे रत्न शिवपुत्र शंभुराजे होते. शिवरायांच्या पहिल्या पत्नी राजमाता सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होय. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने संभाजी महाराज यांचा सांभाळ आज्जी राजमाता जिजाऊ यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांनी ९ वर्षे स्वराज्यांचे संरक्षण केले. मराठा साम्राज्य हे मुघल साम्राज्य, सिद्दी आणि पोर्तुगीज यासारख्या अन्य शेजारील अन्यायी शासकांविरुद्ध लढा देत उभे होते.
छत्रपती संभाजी राजांचा जन्म किल्ले पुरंदर किल्ल्यावर झाला, राजे अवघे २ वर्षांचे असताना त्यांच्या आई सईबाई साहेब यांचा मृत्यू झाला. आईविना पोर सांभाळायची जबाबदारी त्यांच्या आज्जी, शिवाजी महाराज यांच्या आईसाहेब राजमाता जिजाऊ यांनी स्वीकारली होती त्यांनी योग्य संस्कार देत शंभुबाळाला लहानाचे मोठे केले त्याबरोबर त्यांच्या दूध आई म्हणजे गाडे पाटलांच्या आई धाराऊ लाही विसरून चालणार नाही.
लहानपणापासून संभाजी महाराज चातुर्यवान होते. शिवाजी महाराज यांनी कोकणमध्ये मराठा साम्राज्य वाढीसाठी प्रचितगडवर ताबा मिळवला. त्यात स्वराज्यनिष्ठावंत श्रीमंत पिलाजीराजे शिर्के यांची मदत झाली आणि शंभूराजांच्या नेतृत्वात मराठा साम्राज्य वाढायला लागले आनं शिरकाण प्रदेश म्हणजे कोकणची वाट मोकळी झाली. त्यावेळी झालेल्या बोलणी नुसार संभाजीराजे यांचा विवाह कोकणचे राजे पिलाजीराव शिर्के यांच्या कन्या.. स्वराज्य निष्ठ श्रीमंत गणोजीराजे शिर्के यांची लाडकी बहीण.. राजाऊ उर्फ जिऊ म्हणजेच येसूबाई यांच्याशी झाला आणि छत्रपती शिवाजी राजांनी लेक म्हणजे शंभुराजांची बहीण गणोजीराजे शिर्के यांना देऊन साटलोट करत सोयीरसंबंध जोडले गेले. संभाजीराजे व गाणोजीराजे यांचे एकमेकांवर खुप प्रेम होते.बरेच दिवस शंभूराजे शृंगारपूर येथे असताना पिलाजीराजेसह त्यांचे चारही पुत्रांनी शंभुराजांना खूप मोलाची साथ दिली होती. परंतु इतिहास चुकीचा मांडला गेला आणि ध..चा मा..करत पराचा कावळा करून..शंभुराजांसह त्यांच्या जवळच्या नात्यात काही लेखकांनी माती कालवली.
साधारण १ फेब्रुवारी १६८९ रोजी छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांची बैठक कोकणात संगमेश्वर येथे आयोजित केली होती. १ फेब्रुवारी १६८९ रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान संभाजी महाराज यांच्या ३००- ४०० च्या तुकडीवर आपले ३००० चे सैन्य घेऊन संगमेश्वराजवळ चालून आला. मराठ्यांच्या आणि मोघल शत्रूच्या सैन्यात मोठी चकमक उडाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी असल्याने प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने छत्रपती संभाजीराजांसह त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश तसेच अन्य शेकडो लोकांना जिवंत पकडले. मराठ्यांचे महान राजे मोघलांच्या मगरमिठीत सापडले गेले.
संगमेश्वरी अटक झाल्यानंतर संभाजी महाराज, कवी कलश अन्य सैन्यांना पेडगावाच्या भुईकोट किल्ल्यावर म्हणजेच किल्ले बहादूरगडावर आताचा (धर्मवीरगड ) नेण्यात आले, तिथे औरंगजेबाच्या आदेशाने मरकुड्या उंटावरून धिंड काढली गेली, जितके म्हणून हाल करता येतील तितके हाल औरंगजेबाने संभाजी महाराजांचे केले. संभाजी महाराजांसह अन्य पकडलेल्या लोकांना अनेक आमिषे दाखवली परंतु कणखर मराठ्यांनी आपले इमान राखत जीवाच्या बदल्यात किल्ले व खजिना मुघल साम्राज्याला बहाल करण्यास तीव्र नकार दिला याउलट सडेतोड प्रति उत्तरे दिली।।।पण झुकेल तो मराठा राजा कसला. ‘मोडेन पण वाकणार नाही‘ याप्रमाणे मराठा साम्राज्याचा हा राजा मुघलांचे अत्याचार सोसतच राहिला.
१ फेब्रुवारी १६८९ ते ११ मार्च १६८९ असे सुमारे ४० दिवसांपर्यंत असाह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी आपली स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही,संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमी कामगिरीच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याचा विस्तार करत बचाव ही केला होता. मराठा साम्राज्याच्या १५ पट असणार्‍या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराज यांनी एकहाती लढा दिला. संभाजी महाराज यांनी गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करत औरंगजेबाला जेरीस आणले होते. राजांनी आपल्या कार्यकाळात एकूण सुमारे १५० युद्धे पाठ न फिरवता लढली आणि जिंकलीही त्यातील एकही युध्द शंभु महाराज हरले नाहीत.
संभाजी महाराज असे एकमेव अद्वितीय योद्धा होते ज्यांच्या नावावर हा पराक्रम नोंदवला गेला आहे. शंभुराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा धडा शिकवला की त्यांची मराठा साम्राज्या विरोधात औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली. शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य वाढेल आणि मराठा साम्राज्य मातीस मिळेल अशी आशा बाळगून बसलेल्या औरंगजेबाला त्यानंतरही विजय न मिळाल्याने तो चवताळला होता.
शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे संभाजी महाराज यांनी आपल्याकडे घेतली. १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजीराजांचा रायगड किल्यावर राज्याभिषेक झाला. संभाजी राजांना विरोध करणारे स्वराज्य द्रोही स्वराज्यातीलच अनेक मंत्री होते. त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध असणार्‍या अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पेशव्यांना संभाजी महाराज यांनी उदात्त अंतःकरणाने माफही केले होते. आणि त्यांना अष्टप्रधान मंडळात पुन्हा स्थान दिले होते. मात्र, अखेरपर्यंत त्यांनी आपली वाकडी शेपटी सरळ केली नाही विरोधच करत राहिले अखेर त्यांना हत्तीच्या पायाखाली व तोफेच्या तोंडी देत मृत्यूच्या शिक्षा दिल्या.नंतर सुमारे दीडशे वर्षांनी त्यांच्या वंशजांनी रागाच्या भरात बखरीच्या माध्यमातून चुकीचा इतिहास लिहीत शिवराय, सोयराबाई,संभाजीराजे, गणोजीराजे शिर्के सह अनेक मराठ्यांना व नात्यातील लोकांना कलंकित होते. परंतु आता खरा इतिहास देर है..लेकीन दुरुस्त है..म्हणत वास्तव लिहिला जाऊ लागला आहे.
अखेर पेडगाव येथील किल्ले बहादूरगडावर भीमा- सरस्वतीच्या संगमावर औरंगजेबाला संभाजी महाराजांचे अतोनात हालहाल करावयाचे होते.. राजांनी आपली राष्ट्रनिष्ठा व धर्म निष्ठा सोडली नाही त्याचा राग मनावर घेत संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी हशम सरसावले, रांजणातून तप्त लालजर्द सळया शंभूराजांच्या डोळ्यातून फिरल्या. चर्र-चर्र आवाज करीत चर्येवरील कातडी होरपळून गेली.. सारा बहादूरगड (धर्मवीरगड) थरारला पण संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. यामुळे औरंगजेबाचा पारा मात्र जास्तच चढला. नंतर कवि कलशासह अन्य कैद केलेल्या सैन्यांना व संभाजीराजांना वाचवण्यासाठी महाराणी येसूबाई यांनी सांगितल्याप्रमाणे.. कोकणातून गनिमी कावा (गुप्तहेर व वेषांतर करून) करत आलेल्या अनेक शिर्के मंडळींना त्यात पिलाजीराजे शिर्के यांच्या मुलांच्या कत्तली केल्या काहींचे डोळे काढण्यात आले. एवढे करूनही संभाजी महाराज डगमगले नाहीत. पशू बनलेल्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना पुढील शिक्षा जीभ कापायची दिली. दोन हबशी पुढे सरसावले, पण संभाजी राजांचा जबडा काही उघडेना. शेवटी हबशींनी नाक दाबले तसे श्वासासाठी संभाजींचे तोंड उघडले तोच त्यांच्या तोंडात पकड घुसवली गेली. त्या पकडीत पकडलेली राजांची जीभ छाटण्यात आली.. त्यांच्यावर चाललेले हे अत्याचार पाहून भीमा-सरस्वती सुद्धा रडू लागली.
अखेर संभाजी महाराज यांची ११ मार्च १६८९ रोजी भीमा- इंद्रायणी नदीच्या संगमावरील तुळापूर येथे राजांची हत्या करण्यात आली. त्यानंतर वढु बुद्रुक येथे त्यांच्या वर अंत्यसंस्कार केले आनं स्वराज्याचा धाकले धनी अनंतात विलीन झाले.. छत्रपती शंभुराजांना जयंती निमित्त समस्त रयतेकडून त्रिवार मानाचा मुजरा...!

*शंभुजयंती निमित्त मागणी:-*

*राज्य व केंद्र सरकाराने लवकरात लवकर छत्रपती संभाजीराजांच्या नावाचा प्रमुख युगपुरुषांच्या यादीत समावेश करून शासकीय पातळीवर "शंभुजयंती" साजरी करण्याबाबतचा आदेश काढुन योग्य सन्मान करावा - शंभुसेना संघटना*

लेखन:-
*लक्ष्मीकांत गणपतराव शिर्के*
एम.ए.बी.एड. (इतिहास)
(ऐतिहासिक शिर्के घराणे वंशज)
शंभुसेना संघटना
मौजे पेडगाव, किल्ले धर्मवीरगड (बहादूरगड) तालुका- श्रीगोंदा, जिल्हा- अ. नगर