आज पुन्हा १५ बाधितांची भर, चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३२४





आज पुन्हा १५ बाधितांची भर, चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३२४*

आतापर्यत १९५ कोरोना बाधित बरे झाले

जिल्हयात १२९ बाधितांवर उपचार सुरु

गडचांदूर भागात एकाच दिवशी ६ बाधित

दिनचर्या न्युज

चंद्रपूर दि २२ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यात कालपर्यंत ३०९ बाधितांची संख्या होती. आज त्यामध्ये दुपारी तीन पर्यंत १५ बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या ३२४ झाली आहे. यापैकी १९५ बाधितांना उपचाराअंती कोरोना आजाराचे कोणतेही लक्ष नसल्याने सुट्टी देण्यात आली आहे. तर सध्या जिल्ह्यात १२९ बाधितांवर उपचार सुरू आहे.
चंद्रपूर शहरांमध्ये सध्या २६ मार्चपर्यंत टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे आज पुढे आलेले 15 बाधित हे जिल्ह्यातील अन्य भागातील आहे यामध्ये संपर्कातून बाधित झालेल्या पॉझिटिव्हची संख्या अधिक आहे.
गडचांदूर येथे देखील संपर्कातून व बाहेरून आलेले सहा बाधित पुढे आले आहे. नागरिकांनी आवश्यकता नसताना बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी व एकूणच समाजासाठी बाहेरून कुठेही प्रवास केल्यास स्वतः पुढे येऊन चाचणी करून घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आज पुढे आलेल्या रुग्णांमध्ये वरोरा तालुक्यातील हादगाव येथील पंचवीस वर्षीय युवतीचा समावेश आहे. पुणे येथून प्रवास केल्याची त्यांची नोंद आहे. युवती आल्यापासून संस्थात्मक अलगीकरण आत होती.
बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथील एकाच कुटुंबातील चवथा सदस्य असणाऱ्या 18 वर्षीय युवकाचा स्वॅब देखील पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी येथील एकाच कुटुंबातील तिघांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहे.
बल्लारपूर येथील डब्ल्यूसीएल कॉलनी टिळकवाडी येथील संपर्कातील एकाच कुटुंबातील चौथा १८ वर्षीय युवक पॉझिटिव्ह ठरला आहे. या कुटुंबातील सदस्यांनी हैद्राबाद येथून प्रवास केल्याची नोंद आहे.
कोरपना तालुक्यातील पालगाव येथील ५६ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चेन्नई येथून आलेल्या पॉझिटिव्ह बाधिताच्या संपर्कातील हे गृहस्थ असून त्यांना श्वसनाचा त्रास होता.
भद्रावती येथील एकता नगर परिसरातील ५९ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मध्यप्रदेशातील बैतूल येथून प्रवास केल्याची त्यांची नोंद आहे. आल्यापासून ते संस्थात्मक अलगीकरणात होते.
भद्रावती येथील डिफेन्स कॉलनीमध्ये राहणारे ४४ वर्षीय गृहस्थ उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथून प्रवास करून आले होते. आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होते. त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.
गडचांदूर येथील बंगाली कॅम्प परिसरात रहिवासी असणाऱ्या दहा वर्षीय मुलीचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. उत्तर प्रदेशातील फत्तेपुर येथून प्रवास करून आल्याची नोंद आहे.
गडचांदूर येथील चालक असलेले ३५ वर्षीय गृहस्थ पॉझिटिव्ह ठरले. त्यांना श्वसनाचा त्रास असल्याने तपासणी करण्यात आली होती.
अंबुजा सिमेंट उपपरवाही येथे रहिवासी असणाऱ्या 42 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तेलंगाना प्रदेशातून प्रवास केल्याची नोंद असून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातून संसर्ग झाल्याचे पुढे आले आहे.
गडचांदूर येथील एकता नगर वार्ड क्रमांक चार मधील ७१ वर्षीय , ३१ वर्षीय व याच वार्ड क्र ४ मधील माणिकगड सिमेंट फॅक्टरी मध्ये काम करणाऱ्या २५ वर्षे युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिघांनाही संपर्कातून संसर्ग झाला असल्याचे पुढे आले.अमरावती येथून प्रवास करून आलेल्या शेजाऱ्याच्या संपर्कात आलेले हे बाधित आहेत.
या शिवाय वरोरा येथील होल्टाज सागर कॉलनी येथील ४० वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून प्रवास केला असल्याची नोंद असून आल्यापासून ते संस्थात्मक अलगीकरणात होते.
     भद्रावती शहरातील टिळक नगर परिसरातील १४ वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह ठरली आहे. हैदराबाद येथून आलेल्या कुटुंबाच्या अन्य सदस्यांच्या संपर्कातील ही मुलगी आहे.
     ब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथली येथील २८ वर्षीय महिला पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. रानबोथली येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्य आतापर्यंत पॉझिटिव्ह आले आहे.