मोकाट जनावरांचा त्वरीत बंदोबस्त करा - मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार



मोकाट जनावरांचा त्वरीत बंदोबस्त करा - मा. महापौर सौ. राखी कंचर्लावार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर ६ ऑक्टोबर - शहरात मोकाट जनावरांचा वाढता त्रास बघता कडक उपाययोजना करण्याचे निर्देश मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी आज झालेल्या बैठकीत दिले. मोकाट जनावरांमुळे नागरीकांना त्रास होऊ नये या दृष्टीने काय करता येईल याची आढावा बैठक उपायुक्त श्री. विशाल वाघ व सर्व स्वच्छता निरीक्षक यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
बऱ्याच दिवसापासून शहरामध्ये मोकाट जनावरांचा धुमाकूळ सुरु असल्याचे आढळून आले आहे. याबाबत बऱ्याच नागरिकांनी तक्रारी दिल्या आहेत . रहदारी करतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोकाट कुत्रे नागरीकांना ,लहान मुलांना चावा घेण्यासाठी त्यांच्या मागे, वाहनांच्या मागे धावतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच चावा घेतल्यास रेबीज सारख्या घातक रोगसुद्धा होऊ शकतो. मोकाट जनावरांची भीती वाटावी असे वातावरण तयार होऊ नये या दृष्टीने त्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
वराह पालकांना आपली जनावरे गावाबाहेर नेण्याची नोटीस झोन कार्यालयामार्फत देण्यात येणार असुन यावर अंमलबजावणी न केल्यास महानगरपालिकेमार्फत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याकरीता कंपोस्ट डेपो येथे ४००० जनावरे ठेवता येण्याची क्षमता असलेला कोंडवाडा निर्माण करण्यात येणार आहे. पकडलेली जनावरे येथे ठेवण्यात येणार असुन नंतर लिलाव करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भावात चंद्रपूर शहर महानगरपालिका कर्तव्य दक्षतेने कार्य करीत आहे. या परिस्थितीत जर मोकाट जनावरांपासून होणारे संसर्गजन्य रोग पसरले तर नवीन आजाराला तोंड देणे कठीण होईल. त्यामुळे वराह मोकाट फिरताना आढळल्यास व नागरिकांना याचा त्रास झाल्यास चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल व अश्या व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी याप्रसंगी दिले.
मनपातर्फे केली जाणारी सफाई सेवा कोरोनापुर्वीही अविरत सुरू होती व आताही आहे. ' डीप क्लीनिंग ' मोहीमेअंतर्गत नाली सफाई, गाळ उचलणे ,रोड झडाई, फॉगींग, फवारणी, सफाई व निर्जंतुकीकरण असे एक संपुर्ण स्वछता अभियान राबविले जात आहे. दरदिवशी स्वच्छता पथके शहराच्या विविध भागात संपुर्ण स्वछता मोहीम राबवितात. शहरातील प्रत्येक वार्ड, झोनमधे नियोजनबद्धरीत्या स्वच्छता करण्यात येत आहे. सदर मोहीम लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने राबविण्याचे निर्देश त्यांनी याप्रसंगी दिले .
याप्रसंगी उपायुक्त श्री. विशाल वाघ, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष गर्गेलवार, श्री.विवेक पोतनुरवार, श्री. भूपेश गोठे, श्री. प्रदीप मडावी, श्री.अनिरुद्ध राजूरकर, श्री. महेंद्र हजारे, श्री. अनिल ढवळे उपस्थित होते