युट्यूब चॅनेल प्रसारमाध्यम नाही; पत्रकार म्हणून मिरवल्यास गुन्हा दाखल होणार
पुणे (सुचिता भोसले) : काही व्यक्ती अनधिकृतपणे वृत्तपत्रे प्रकाशित करतात व सोशल मीडियाच्या माध्यमातूनही स्वत: प्रसारमाध्यम प्रतिनिधी असण्याचा बनाव करतात.
अशा प्रकारे प्रसारमाध्यम प्रतिनिधी असल्याचे भासवून ज्या व्यक्ती समाजात अनधिकृत काम करीत आहेत त्यांच्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी सूचना जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मुद्रित माध्यमांची अधिकृतता रजिस्टार ऑफ न्यूजपेपर ऑफ इंडिया या शासकीय संस्थेकडून तर वृत्तवाहिन्यांची अधिकृतता माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार कडून विशिष्ट नियमावली व कार्यवाहीद्वारे निश्चित केली जाते.
अद्याप यू-टयूब चॅनल्सबाबत प्रसारमाध्यम म्हणून शासकीय अधिकृतता निश्चित करण्याची अशी कोणतीही नियमावली, संहिता अस्तित्वात नसल्याने यू-टयूब चॅनल्स हे अधिकृत प्रसारमाध्यम नसून ते फेसबुक, व्हॉटस्अप, व्टिटर, इन्स्टाग्राम इत्यादी सारखेच केवळ एक सोशल मिडीया प्लॅटफॉर्म आहे.
त्यामुळे लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी व नागरिकांनी अशा प्रकारे अनधिकृतपणे प्रसारमाध्यम प्रतिनिधी म्हणून काम करणार्यांपासून सावध राहावे.
तसेच समाजात अनधिकृतपणे प्रसारमाध्यम प्रतिनिधी म्हणून वावरणार्या तथाकथित प्रसारमाध्यम प्रतिनिधींनीही याची नोंद गांभीर्याने घ्यावी, असा सूचक इशारा जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आला आहे.