अनेक विभागावर पिआरसीचा ठपका ; एक महिन्यात कारवाईचा अहवाल पाठविण्याचे सिईओंना समितीचे निर्देश chandrapur



पंचायत राज समितीने ‘त्या’ विभागातील सर्वाधिक काम असमाधानकारक असल्याचे नोंदविले

अनेक विभागावर पिआरसीचा ठपका ; एक महिन्यात कारवाईचा अहवाल पाठविण्याचे सिईओंना समितीचे निर्देश

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पंचायत राज समितीने तीन दिवसात चंद्रपूर जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामिण भागातील केलेल्या पाहणी अंती आरोग्य विभाग, समाजकल्याण, शालेय पोषण आहार आणि बांधकाम या विभागातील सर्वाधिक असमाधानकारक काम असल्याचे नोंदविले असून समितीने केलेल्या सूचना, दिलेले निर्देशांची कारवाईचा अहवाल येत्या एक महिन्यात मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवावा, असे आदेश पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ.संजय रायमूलकर यांनी आज जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डीले यांना दिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पंचायत राज समितीने ९ फेब्रुवारी ते आज ११ फेब्रुवारीपर्यंत काय काय आढावा घेतला यासंदर्भात समितीचे अध्यक्ष आ.संजय रायमुलकर यांनी सभागृहात माध्यमांशी बोलतांना ही माहिती दिली. सन २०११-१२ आणि २०१७-१८ या आर्थिक वर्षातील लेखा परिक्षणातील आक्षेपावर समितीने सविस्तर चर्चा केली व सबंधित विभागप्रमुखांची साक्ष नोंदवली. प्रशासनाला काही सूचना केल्यात व ज्या स्थानिक तक्रारी समितीकडे प्राप्त झाल्यात त्या सोडविण्याच्या सूचना केल्याचे त्यांनी सांगीतले. उत्पन्न वाढीसंदर्भात समितीने सूचना केल्या आहेत. अनेक कामांमध्ये अनियमितात आढळून आली मात्र त्या सध्याच उघड करता येणार नसून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्यास सांगण्यात आले आहे व हा अहवाल विधीमंडळासमोर सादर करण्यात येईल, असेही समिती अध्यक्ष म्हणाले. जि.प.चे अनेक रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाला कळविण्यात येईल असेही ते म्हणाले. यावेळी आ.किशोर जोरगेवार, सिईओ राहुल कर्डीले आदींसह समिती सदस्य आमदार उपस्थित होते.