उध्याला वादळी वाऱ्यासह पाऊस व वीज पडण्याची शक्यता, प्रादेशिक हवामान केंद्राची माहितीउध्याला वादळी वाऱ्यासह पाऊस व वीज पडण्याची शक्यता, प्रादेशिक हवामान केंद्राची माहिती

वीजेपासून बचावासाठी प्रशासनाच्या सूचना
18 फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस व वीज पडण्याची शक्यता

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर दि. 17, प्रादेशिक हवामान केंद्र, भारतीय हवामान विभाग, नागपुर, यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात दि. 17 व 18 फेब्रुवारी, 2021 रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस व वीज पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व आकाशात ढग जमा होऊन मेघगर्जना व वेगाने वारे वाहत असल्यास सुरक्षिततेच्या बाबींचे पालन करावे, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी दिल्या आहेत.
या सुचनांनुसार नागरिकांनी घराबाहेर असल्यास, तर त्वरीत आसरा शोधावा. इमारत हा सुरक्षित आसरा आहे, पण इमारत नसेल तर गुहा, खड्डा किंवा खिंडी सारख्या भागात आश्रय घ्यावा. झाडे ह्यासाठी कधीच सुरक्षित नसतात. उंच झाडे स्वतः कडे विजेला आकर्षित करतात. आसरा मिळाला नाही, तरी परिसरातील सर्वात उंच जागा टाळा. जर जवळपास फक्त उंच झाडे असतील, तर झाडाच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर थांबा जमिनीवर वाका किंवा वाकून बसा. घरातच राहा किंवा बाहेर असाल, तर घरी जा. जर वादळाची चाहूल लागली, तर अगदी गरजेचे नसेल तर बाहेर जाणे टाळा. जर तुम्ही घराबाहेर असाल आणि तुम्ही वीज चमकताना बघितल्यावर मनातल्या मनात 1 ते 30 पर्यंत अंकमोजणी करा जर अंकमोजणी 30 पर्यंत मोजण्याच्या पहिले तुम्ही वीजेचा गडगडाट ऐकला तर अशा वेळेस सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. जेव्हा विजा चमकणे किंवा वादळ खूप जोरात चालू असेल, तेव्हा धुराडी, रेडिएटर्स, स्टोव्ह, धातूचे नळ, आलेल्या जागा आणि टेलीफोन इ. विजेच्या सुवाहकांपासून दूर रहा. पाण्यातून तात्काळ बाहेर या, छोट्या नावेतून पाण्यातून जात असाल तरीही बाहेर निघा. जर तुम्हाला विद्युत भारित वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील, तर तुमच्या वर वीज कोसळण्याची शक्यता आहे. यावेळी त्वरीत जमिनीवर ओणवे व्हावे किंवा गुडघ्यात मान घालून बसावे.
काय करू नये :
विद्युत उपकरणे चालु करून वापरू नका. जसे की-हेअर ड्रायर, विद्युत टुथ ब्रश किंवा विद्युत रेझर, जर विज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली, तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो. वादळात टेलिफोनचा वापर टाळा. विज टेलिफोनच्या घरावरील तारांमधुन वाहू शकते. बाहेर असतांना धातूच्या वस्तूंचा वापर टाळा. विनाकारण घराबाहेर पडू नका.
सर्व नागरिकांनी उपरोक्त सूचनांचे पालन करावे आणि स्मार्ट फोन असल्यास त्यामध्ये भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था, पुणे (IITM) व भारतीय हवामान विभागाने विकसित केलेले दामिनी अॅप इंस्टॉल करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी कळविले आहे.