चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनची भुमिका संशयास्पद! गटनेते पदाचा वादंग थांबता थांबेना!






चंद्रपूर महानगर पालिका प्रशासनची भुमिका संशयास्पद!गटनेते पदाचा वादंग थांबता थांबेना!

दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिका मध्ये नुकतीच 23 ऑगस्टला स्थायी समितीची सभा ऑनलाईन पध्दतीने पार पडली. व त्या नंतर 31 तारखेला सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचा अजेंडा पण मनपा प्रशासनाने काढला. पण कुणाच्याही कानी, मनी ,धनी नसताना 30 ऑगस्टला प्रशासनाच्या वतीन तडका फडकी स्थायी समितीची सभा असल्याचे पत्रक जाहीर करावे लागते व 30 तारखेलाच स्थायी समिती सभा स्थगित करण्यात आली असे पत्रकाद्वारे जाहीर करावे लागते ,याचे प्रचंड आश्चर्य वाटते.यावरून मनपा प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटते! की,
यामागे काय घोड बंगाल असेल त्याबाबत अंदाज बांधणे कठीण दिसते. पण शंका येते ती अशी की,23 ऑगस्टला स्थायी समिती सभेत स्थायी समिती सभापती सह स्थायी समितीतील 8 सदस्य निवृत्त झाले होते त्यामुळे अपेक्षा अशी होती की, येणाऱ्या 31 ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांना स्थान मिळण्याचा व त्यातून स्थायी समिती अध्यक्ष निवड करण्याचा विषय आमसभेच्या अजेंड्यात घेण्यात येईल. पण प्रशासनाच्या माहिती नुसार महापौर राखी कांचार्लावार यांनी आपल्या अधिकाराचा वापर करीत स्थायी समिती नवीन सदस्यांना स्थान मिळण्याचा वा सभापतीच्या निवडणुकीचा विषय येऊ दिला नाही. असे असताना सर्वत्र चर्चा होती की,सभापती पदाची निवडणूक लांबणीवर जाईल. अशातच 30 ऑगस्टला स्थायी समिती सभा होणार असल्याचे व स्थायी समिती सभा स्थगित झाल्याच्या पत्रकाने सर्वत्र चर्चा होत आहे की, हा नेमका कुठला प्रकार समजावा ? कारण जेव्हां स्थायी समितीत नियमाने असणाऱ्या 16 सदस्या पैकी 8 सदस्य जेव्हा निवृत्त झाले तर नव्याने 8 सदस्य नियुक्ती न होऊ देता व त्यातून स्थायी समिती सभापतीची निवड न करता ही सभा कुठल्या अधिकाराने, हेतूने घेण्याचे पत्रक काढण्यात आले होते व असे काय झाले म्हणून ही सभा तांत्रिक अडचणीने स्थगित करण्यात आली? म्हणून काहीतरी घोड बंगाल असेल असे म्हणण्यास चंद्रपूरच्या नागरिकांना हरकत नाही!

गटनेते पदाचा वाद विकोपाला!

चंद्रपूर लोकलेखा समितीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मनपातील भाजपचे गटनेते वसंत देशमुख यांच्यातील वाद आता प्रचंड विकोपाला गेला असून, स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीआधी देशमुख यांची गटनेते पदावरून उचलबांगडी करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. शनिवारी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात पक्षाच्या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत वसंत देशमुख यांची वागणूक पक्षाच्या हिताची नसल्याचा ठपका ठेवत त्यांना गटनेते पदावरून काढण्यासाठी गटातील ३२ नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या स्टॅम्प पेपरवर घेण्यात आल्या. एक- - दोन दिवसात विभागीय आयुक्तांची वेळ मागून त्यांच्यासमोर सर्व नगरसेवकांची परेड करून गटनेता
बदलला जाण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.
गेल्या फेब्रुवारी महिन्यात स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक झाली. त्यावेळी सभागृह नेतेपदाचा राजिनामा वसंत देशमुख
यांच्याकडून लालीपाप देऊन घेण्यात आला. त्यामुळे त्यांची स्थायी समिती सभापतीपदी वर्णी लागेल, अशी पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात चर्चा रंगोली. शेवटपर्यंत देशमुख त्यांचे नाव निश्चित मानले गेले होते. मात्र ऐनवळी उमेदवारी अर्ज दाखल करताना दगाफटका करण्यात आला. अशाप्रकारचा आरोपही वसंत देशमुख यांनी केला होता.
महानगरपालिकेतील वातावरण सध्या गरम आहे. विरोधकांपेक्षा सत्ताधारी पक्षातच सुंदोपसुंदीचा खेळ चालू असल्याने त्याचे पडसाद मंगळवारी होणाऱ्या आमसभेत पडणार असल्याचे चित्र दिसत आहे. स्थायी समितीतून आठ सदस्य निवृत्त झाल्याने तेवढेच नवीन सदस्य नियुक्त करण्याची प्रक्रिया मंगळवारच्या आमसभेत होणे अपेक्षित होते. मात्र, भाजपातील अंतर्गत मतभेदामुळे स्थायी समिती सदस्यांच्या नावावर एकमत झाले नाही. त्यामुळे आमसभेच्या अजेंड्यावर नवीन स्थायी समिती सदस्य नियुक्तीचा मुद्दा आला नाही. याचेही पडसाद आमसभेत पडणार आहेत. त्यामुळे या आमसभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.