अबब! म्हशीला झाले पांढरेशुभ्र रेडकू
सातारा
काळ्या रंगाचे किंवा डोक्यावर एकाद-दुसरा पांढरा ठिपका असणारे म्हशीचे रेडकू आपल्यापैकी अनेकांच्या पाहण्यात आले असेल.परंतु सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातीलवाल्मिकी पठारावरील पाटीलवाडी (रुवले ) येथील एका शेतकऱ्याच्या म्हशीला चक्क गाईच्या वासरासारखे पांढरेशुभ्र रेडकू परिसरात तो औत्सुक्याचा विषय ठरला आहे.हे वेगळ्याच प्रकारचे रेडकू बघायला नागरिक संबंधित शेतकऱ्याच्या घरी गर्दी करत आहेत. दरम्यान,गुणसूत्रातील बदलामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी करत आहेत.वाल्मिकी पठारावरील पाटीलवाडी या छोट्याशा गावातील सचिन लक्ष्मण साळुंखे हे कुटुंबियांसह मुंबईला राहायला होते.परंतु लॉकडाऊनमुळे नोकरीत अडचण निर्माण झाल्याने ते गावी येऊन शेती करू लागले.आता ते शेतीत चांगलेच रमले असून यापुढे नोकरी चाकरी करणार नसून शेतीच करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिवाय शेतीला जोड म्हणून दुग्ध व्यवसाय निवडला आहे.साळुंखे यांच्याकडे तीन म्हशी असून यातील एका म्हशीला एक पांढरेशुभ्र रेडकू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.ही बातमी कळल्यावर गावातल्या व आसपासच्या लोकांनी बघायला गर्दी केली आहे. याबाबत बोलताना सचिन साळुंखे म्हणाले,'ही म्हैस आमच्या घरच्या दुसऱ्या एका म्हशीची पैदास आहे. कृत्रिम रेतन न करता तिची नैसर्गिक गर्भधारणा झाली होती.डोक्यावर पांढरे ठिपके असलेले किंवा भुरकट रंगाचे रेडकू आतापर्यंत पाहण्यात होते.मात्र असे पांढरेशुभ्र रेडकू झाल्याने आम्ही सगळेच अचंबित झालो आहोत.डॉक्टरांनी रेडक्याची तपासणी केली असून त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले.गुणसूत्राच्या बदलामुळे असे घडले असावे असा अंदाजही डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.